अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे श्वेत-कृष्णवर्णीय हे कार्ड अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. मतदानपूर्व सर्व्हेचे निष्कर्ष चुकीचे ठरवत ते तगडी लढत देण्यात यशस्वी ठरले. मतदानानंतरच्या चाचणीनुसार, ट्रम्प यांच्या अप्रवासी धोरणाविरुद्ध ८७% आणि ६७% आशियाई वंशाच्या लोकांनी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांना मतदान केले. २० वर्षांतील सर्वात रोमांचक लढतीत बायडेन विजयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांना २३७ इलेक्टोरल मते पडली आहेत. ३३ मते असलेल्या ३ राज्यांत ते आघाडीवर आहेत. तर, ट्रम्प यांना २१३ मते असून ५४ इलेक्टोरल मते असलेल्या ४ राज्यांत ते आघाडीवर आहेत. व्हाइट हाऊसमध्ये विराजमान होण्यासाठी २७० मते हवी आहेत. अद्याप पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया, विस्कोन्सिन आणि नॉर्थ कॅरोलिनासारख्या राज्यांतून टपालाने पाठवलेली मते मोजलेली नाहीत. म्हणूनच ११६ वर्षांत प्रथमच मतदानादिवशी राष्ट्राध्यक्ष ठरला नाही. या राज्यांतील ८० लाख मतांची मोजणी होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी आपल्या विजयाची घोषणा केली होती. या मतांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याची धमकीही दिली आहे. तर, बायडेन यांनी लोकांना संयम राखण्याचे आवाहन करत आपण विजयाकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी म्हटले आहे की, पूर्ण मतमोजणी होईपर्यंत निकाल स्पष्ट होणार नाही. भारतीयांची अधिक लोकसंख्या असलेल्या ६ पैकी ५ राज्यांत बायडेन यांच्या पक्षाला विजय मिळाला आहे. भारतीय वंशाचे डॉ. अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती विजयी झाले आहेत. रिपब्लिकन नीरज अंतानी ओहायोतून सिनेटमध्ये दाखल झाले आहेत. न्यूयॉर्कमधून मीरा नायर यांचा मुलगा जोहरान व वकील जेनिफर राजकुमार विजयी ठरले.
> १९९२ पासून आतापर्यंत अध्यक्षांना दोन टर्म: १९९२ पासून २०१६ पर्यंत केवळ तीन अध्यक्ष झाले. बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा. ट्रम्प हरले तर जॉर्ज डब्ल्यू बुश सीनियर यांच्यानंतर अमेरिकेत एकही अध्यक्ष दुसऱ्यांदा निवड झालेला नाही.
> परंतु, ट्रम्प यांना २०१६ च्या तुलनेत अधिक मते : ट्रम्प यांना आतापर्यंत ६.७ कोटींहून अधिक मते पडली आहेत. २०१६ मध्ये त्यांना ६.३ कोटी मते पडली होती. बायडेन यांना आतापर्यंत ६.९५ कोटी मते पडली आहे. २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांना ६.६ कोटी मते पडली होती.
गेमचेंजर: 6.5 कोटी टपाली मते ठरवणार नवा राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेत प्रथमच टपालाने पाठवलेली मते सरकार पलटवू शकतात. यंदा टपालाने (मेल-इन) विक्रमी ६.५ कोटी मते पडली होती. हा घोळ असल्याचे ट्रम्प सुरुवातीपासूनच म्हणत आहेत. दुसरीकडे, बायडेन व कमला हॅरिस यांनीही आपली मते टपालाने पाठवली. ट्रम्प यांनी बूथवर जाऊन मतदान केले आणि आपल्या समर्थकांना मतदानाच्या दिवशीच मतदानाचे आवाहन केले. आता हीच टपाली मते ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमधून गच्छंती करू शकतात. आता फक्त मेल इन मतांची माेजणी बाकी आहे. यात बायडेन आघाडीवर असल्याचे अमेरिकेचे सर्व पोल सांगत आहेत. यामुळे ट्रम्प सुरुवातीपासून त्याविरुद्ध बोलत आलेले आहेत.

