मेट्रो आणि महापालिका यांचा या योजनेतील प्रत्यक्षातील सहभागामध्ये दडलंय काय ?
पुणे- ‘सायकल चालवा ,प्रदूषण घालवा ‘ असा नारा देत महापालिकेच्या सभागृहात आलेले नगरसेवक आठवा … तब्बल सुमारे साडेतीनशे कोटीची राख रांगोळी सायकल योजनेवर केल्यावर आता पुन्हा एकदा मेट्रो ला गाठण्यासाठी सायकलींचा घाट घालण्याची हौस भागविण्यात येणार आहे. या पूर्वी आणलेल्या सायकली ,उभारलेले सायकल मार्ग यांनी पुणेकरांच्या वाहतूक समस्येत भरच घातली होती आणि कुणाचे तरी चांगभले केले होते हे स्पष्ट असतानाही आता मेट्रोच्या प्रवाशांना घरापासून स्थानकापर्यंत पोचण्यासाठी महामेट्रोने मायबाईकच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध करून दिल्या असून त्या शहरात पोचल्याचे वृत्त आहे. मेट्रोच्या उदघाटनाच्या दिवसापासून त्या पुणेकरांना उपलब्ध होणार आहेत.वनाज- रामवाडी मार्गावर पहिल्या टप्प्यात मेट्रो वनाज, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, नळस्टॉप आणि गरवारे कॉलेज दरम्यान धावणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या मार्गावर मेट्रो कार्यान्वित होणार आहे असे सांगितले जाते आहे.दोन्ही शहरांतील ३१ मेट्रो स्थानकांवर या सायकली उपलब्ध होणार आहेत. मात्र यासाठी महापालिका नेमके काही खर्च करणार आहे काय ? काही जागा देणार आहे काय ? किंवा अन्य खाजगी वाहनांची कोंडी करण्याचा डाव यातून रचला जातोय काय ? असे प्रश्न पुढे येत आहेत .
सायकलींचे भाडे
- दरमहा सुमारे ६०० रुपये
- वन टाईम युज – किमान २० रुपये १० तासांसाठी
- १० तासांपुढे प्रत्येक तासाला भाडे २ रूपये
प्रवाशांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत जाण्याठी मायबाईकतर्फे सायकली भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे महिन्यांचे भाडे ६०० ते ७०० रुपये असू शकेल. प्रवाशाने दरमहा तत्त्वावर ही सायकल घेतल्यास तो घरीही घेऊन जावू शकेल. घरापासून मेट्रो स्थानकावर पोचल्यावर तेथे सायकल स्टॅंडवर सोडायची. मेट्रोतून पुढे प्रवास करायचा. त्या स्थानकावर उतरल्यावर तेथील सायकल घ्यायची आणि पुढे प्रवाशाने इच्छितस्थळी जायचे, अशा प्रकारची ही योजना आहे.मायबाईकच्या ॲपवरून प्रवाशांना ही सायकल लॉक, अनलॉक्ड करता येईल. तसेच सायकलच्या भाड्याची रक्कमही ॲपवरून रिचार्ज करता येईल. त्यासाठी प्रवाशांना ॲपचा वापर करावा लागेल. या सायकलला जीपीएस सिस्टीम असेल. तसेच ॲपद्वारेच तिचा वापर करता येईल. सायकल भाडेतत्त्वावर न घेताही ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना या सायकलचा वापर करणे शक्य होणार आहे. मेट्रोच्या उदघाटनाच्या दिवसापासून या सायकली प्रवाशांना उपलब्ध होतील असेही सांगितले जातेय .
फ्लॅशबॅक
पुणे शहरांमध्ये लोकांचा सायकलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांवरुन चालण्याचा अनुभव सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायक असायला हवा. शहराच्या वाहतूक यंत्रणेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 2016 मध्ये ‘पुणे सायकल प्लॅन’ तयार केला होता . महापालिकेच्या या उपक्रमाला शहरी विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारने समर्थन दिले होते .
या सायकल प्लॅनची ४ प्रमुख उद्दिष्टे सांगितली होती ती पुढीलप्रमाणे
- पुणे सायकल प्लॅनअंतर्गत शहरात ३०० किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार करण्याची योजना
- या ट्रॅकची रुंदी, लांबी, जंक्शन इत्यादी बाबींचा तसेच इतर आणखी संबंधित गोष्टींचा समावेश असणारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे
- सायकल शेअरिंगसाठी सार्वजनिक यंत्रणा निर्माण करणे, पहिल्या टप्प्यात 3000 सायकल, 250 स्थानके आणि 40 विभागांचा समावेश
- अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकची रचना, सायकल वॉर्डन, सीसीटीव्ही आणि ई-चलन्ससह अंमलबजावणीची योजना
- On 14 December 2017, the PMC General Body approved the Comprehensive Bicycle Plan for Pune. The Cycle Plan has been prepared with support from the Ministry of Housing and Urban Affairs, Govt of India.
- असे सांगितले जाते या योजने साठी सुमारे साडेतीनशे कोटी खर्च करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आजवर यावरील कोणतीही माहिती प्रकाशित केली नाही .

