पुणे-व्यवसाय, उद्योग कोणताही असो त्याला गरज असते जाहिरातीची, ब्रँड निर्माण करण्याची, त्याला छोटा, मोठा असा काही अपवाद ठरत नाही. ब्रँड निर्माण करण्याचे महत्त्व नेमके काय? एखादा ब्रँड कसा घडतो याची माहिती देणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक ‘ब्रँडनामा’ लेखक अभिजीत जोग यांनी आणले आहे, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (2 डिसेंबर) होणार आहे.
रसिक आंतरभारतीच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या ‘ब्रँडनामा’चे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी तमाम मराठीजनाच्या मनावर अधिराज्य निर्माण करत व्यवसायात स्वतःचा ब्रँड निर्माण केलेल्या चार उद्योजकांशी संवाद साधण्यात येणार आहे, यामध्ये सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर, परांजपे स्किम्सचे एम. डी. शशांक परांजपे, चितळे बंधूचे श्रीकृष्ण चितळे, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांची मुलाखत मराठीतील आघाडीचे चित्रपट लेखक क्षितिज पटवर्धन घेणार आहेत. हा कार्यक्रम 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. देवांग मेहता ऑडोटोरियम,पर्सिस्टंट सिस्टिम्स, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.
‘ब्रँडनामा’ पुस्तकाचे लेखक अभिजीत जोग हे गेल्या 30 वर्षांहून अधिककाळ जाहिरात आणि ब्रॅंडिंग क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी जॉन डिअर, फिबर, सारस्वत, मारुती सुझुकी, टाटा ग्रीन बॅटरी, टीव्हीएस, शार्प अशा राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय ब्रँडस् सोबत काम केलेले आहे. अभिजीत जोग यांनी ‘ब्रँडनामा’ मधून ब्रॅंडिंग का आवश्यक आहे? ब्रँड कशासाठी आणि का असावा? अशा प्रश्नांची उत्तरे असंख्य उदाहरणासह दिली आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व आपल्या व्यवसायाची वृद्धी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

