मुंबई-हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल करताच मोठा गदारोळ उडाला. पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून वातावारण इतके तापले की सभागृहाचे कामकाज 30 मिनिटे स्थगित करण्यात आले. शिवसेनेचे आमदार नितीन राऊत यांनी 15 लाखांची आठवण केली. तर भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. त्यावरूनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप आमदार संतप्त झाले.
नितीन राऊत यांनी वीजेच्या प्रश्नावर बोलताना कोरोना काळ आल्याने वीज माफीचे आश्वासन पूर्ण झाले नाही असे म्हटले. यानंतर भास्कर जाधव यांनी पुनरुच्चार करून पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरच संतप्त देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान केला आहे. त्यांनी सभागृहात माफी मागावी. त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे असा आक्रामक पावित्रा फडणवीस यांनी घेतला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्यावर आपला आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली.
विरोधक आक्रमक झाल्याचे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी फडणवीस आणि इतर भाजप आमदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजप आमदारांनी काहीही ऐकून घेतले नाही. उलट जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते म्हणून भास्कर जाधव यांना समज द्यायला हवा अशी मागणी फडणवीस यांनी केली
यानंतर भास्कर जाधव स्वतः पुन्हा उभे राहिले. त्यांनी आपण केलेल्या विधानाने भाजप आमदारांची मने दुखावल्याने दिलगिरी व्यक्त केली. तसेच आपले शब्द आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला अंगविक्षेप असे दोन्ही मागे घेत असल्याचे सांगितले. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांचा राग शांत झाला नाही. आमदार भास्कर जाधव माफी मागत नाहीत. त्यांना या घटनेचे गांभीर्य देखील नाही. ते ही गोष्ट हसण्यावर नेत आहेत असा आरोप फडणवीस यांनी केला.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सभागृहात अपमान झाला. उद्या कुठल्याही मोठ्या नेत्याचा अपमान होऊ शकतो. त्यावेळी सुद्धा असेच म्हटले जाईल का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. यानंतर उडालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले आणि भास्कर जाधव यांनी माफी मागितली.
