पुणे- कुणाच्या तरी दबावाखाली येऊन महापालिकेने गरिबांच्या आरोग्यासाठी, उपचारासाठी असलेली शहरी गरीब योजना बंद केली तर खबरदार .. त्याची फळे तुम्हाला लगेचच भोगावी लागतील , महिलांचा ,गरीबांचा उद्रेक तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी दिला आहे .
त्या म्हणाल्या,’गोरगरिबांची शहरी गरीब योजना बंद करून सल्लागार आणि इन्शुरन्स कंपन्या यांचे पोट भरण्यासाठी ही योजना बंद पाडण्याचा हा उद्योग सुरू आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. शहरी गरीब योजनेत एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले नागरिक व झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक हे याचा लाभ घेतात.कोरोना काळ आल्यापासून मागील एक वर्ष लॉकडाऊन मुळे सर्व धंदे दुकाने जवळपास बंद होती दुकाने उघडली तरीदेखील व्यवसाय जसा हवा तसा कोणालाही करता आला नाही त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे
त्या पुढे म्हणाल्या,”आर्थिक उत्पन्न हे दरवर्षी नागरिकांचे बदलत असते एक नागरिक सोसायटीमध्ये राहतो म्हणून त्यांनी शहरी गरीब योजनेचा लाभ घ्यावयाचा नाही असे म्हणणे चुकीचे आहे सोसायटी मध्ये दोन खोल्यांचे फ्लॅट मध्ये राहणारा नागरिक देखील आजच्या काळात नोकरी गमावून बसला आहे किंवा त्याचा व्यवसाय पूर्वी जसा होता, तसा आता होत नाही ही परिस्थिती सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे जोपर्यंत पुणे महापालिकेचे दवाखाने सक्षम होत नाहीत तोपर्यंत शहरी गरीब योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे व तिचा विस्तार केला पाहिजे असे माझे मत आहे
शहरी गरीब योजनेचा लाभ काही सोसायटीमध्ये राहणारे नागरिक घेत आहेत म्हणून ही योजनाच बंद करा हे चुकीचे आहे शहरी गरीब योजनेची आजपर्यंत हजारो खऱ्या खुऱ्या गरजवंतांना मदत झाली आहे. पुणे महापालिकेची एकंदरीत आरोग्य यंत्रणा, प्रथमिक आरोग्य केंद्र व दवाखान्याची स्थिती सक्षम नाही पुणे महापालिकेची सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेली आणि यशस्वी ठरलेली शहरी गरीब ही एकमेव योजना आहे. आरोग्यावर एकूण बजेटच्या 6 टक्के खर्च करणे बंधनकारक आहे, ते पुणे महापालिका करत नाही. शहरी गरीब योजनेसाठी केलेला अत्यावश्यक खर्च पुणे महापालिकेने केला पाहिजे पुणेकरांचे कररूपी पैसे पुणेकरांसाठी वापरले जावेत या योजनेतील अटी, नियम यांचे पालन झाले पाहिजेच ते प्रशासनाने सक्षमपणे करावे.पण असा योजनाच बंद करण्याचा बेमुर्वतखोरीचा निर्णय घेऊ नये .असेही आवाहन त्यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना केले आहे. महापालिकेच्या शहरी गरीब योजनेला बंद पाडण्यासाठी उद्योग केलेल्यांनी आपण कुठे कसे दौरे केलेत आपल्या खाली किती अंधार आहे हे तपासून पाहावे असे जाहीर आवाहनदेखील आता करण्यात येऊ लागले आहे . जनतेतूनसुद्धा या बाबत आता पडसाद उमटू लागले आहेत. या योजनेतून लोक हॉस्पिटल मध्ये उपचार घेतात .सहली अभ्यास दौरे सारखी थेरंं करत नाहीत. असेही येथे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.