पुणे- पुण्यातील सामजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिर्डीत जाऊन संस्थानच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केल्यानंतर ,शिवसेनेचे काही कार्यकर्ते आणि ब्राम्हण महासंघाचे काहीजण यांनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात शिर्डीत काउंटर आंदोलनाची तयारी सुरु करताच त्यांना विरोध न करता पोलिसांनी तृप्ती देसाई यांना मात्र शिर्डीच्या प्रचंड अलीकडे १०० किलोमीटर अंतरावर सुप्याजवळ अडवून धक्काबुक्की करत ताब्यात घेतले आणि सुपे पोलीस ठाण्यात नेले .
काय आहे प्रकरण
शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.देवस्थानकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावण्यात आला होता. या निर्णयाच्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवस्थानच्या पुजाऱ्यांबद्दल ‘ते कसे अर्ध कपड्यात चालतात ‘ असे विधान केलं. त्यानंतर आज तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला निघाल्या आणि तिथे साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याच्याबाबत ठिय्या आंदोलन करणार होत्या . या फलकावरून वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना इशारा दिला होता. ब्राम्हण महासंघाने देखील त्यांना प्रती आव्हान दिले होते.

