पुणे : पुण्यात पुराने थैमान घालून सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळून दोन वर्षे उलटली आहेत. यावेळी महापालिकेत आणि राज्यातही सत्तेवर असताना आपण काय केले आधी सांगा. पाच महिन्यांपूर्वी निविदा काढूनही ठेकेदाराने काम केले नाही. या गळतीसाठी पालिकेत निधीची गळती कशी झाली याची माहिती घ्या आणि मगच संरक्षक भिंतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव द्या, अशी मागणी राष्टवादी कॉँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुरामुळे पडलेल्या संरक्षक भिंतींच्या कामासाठी राज्य शासनाकडे ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पूर येऊन दोन वर्षे उलटली, त्या काळात भाजपाचे सत्ताधारी पदाधिकारी झोपले होते का? असा सवाल देशमुख यांनी केला आहे. देशमुख म्हणाले, पुण्यामध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये महापूर आला. शेकडो सोसायट्यांच्या संरक्षक भिंती पडून पुराचे पाणी घुसले. पावसाची चाहूल लागल्यावर अजूनही येथील रहिवाशांना धास्ती वाटते. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दोन वर्षे काहीही केले नाही. प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली. त्यांनी २८१ कोटी रुपयांचा अहवाल दिला होता. त्याप्रमाणे स्थायी समितीने ७७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रियाही राबविली होती. मात्र, ही कामे झालीच नाही. त्यावेळी कोरोनाचे संकटही नव्हते. त्यामुळे त्यामागे लपायलाही भाजपाला जागा नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यावर आता महापालिका राज्य शासनाकडे निधीची मागणी करून आपली जबादारी झटकत असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.
संरक्षक भिंतीसाठी निधी मागण्याअगोदर पालिकेच्या निधीतील गळती बंद करा : प्रदीप देशमुख
Date:

