धमकीची भाषा करू नये- छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊ यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अवमानकारक लिखाणप्रकरणी आपली भूमिका मांडावी.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राजकारणात जातीयवाद वाढला हा राज ठाकरेंचा जावईशोध
पुणे :राज ठाकरे यांची जेम्स लेन प्रकरणातील भूमिका पुन्हा एकदा सर्वांसमोर आली.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राजकारणात जातीयवाद वाढला असल्याचा जावईशोध राज ठाकरे यांनी लावला.त्यावरील प्रवीण गायकवाड यांचे लिखाण मनसेच्या वसंत मोरेंना जिव्हारी लागले असावे आणि त्यांनी गायकवाड यांच्याबद्दल धमकीची भाषा वापरली .आपली क्षमता काय ? आपण कोणावर टीका करतो याचे भान मोरेंनी ठेवावे असा टोला आणि सल्ला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मनसे चे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना दिला आहे आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि प्रसिद्धी पत्रक काढून हा सल्ला दिला .वसंत मोरे यांना गायकवाड यांच्या लिखाणावर आक्षेप असेल, तर त्यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढावेत. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊ यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अवमानकारक लिखाणप्रकरणी आपली भूमिका मांडावी, असे आम्ही जाहीर आवाहन करत आहोत. केवळ प्रसिद्धीसाठी पोकळ धमक्या देण्याचा प्रकार मोरे यांनी करू नये.
जगताप यांनी याबाबत असे म्हटले आहे कि,’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याबाबत केलेल्या एकेरी आणि धमकीवजा वक्तव्याचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. वसंत मोरे यांनी या वक्तव्याबाबत तत्काळ दिलगिरी व्यक्त करावी. मोरे यांनी निव्वळ प्रसिद्धीसाठी कोणाही व्यक्तीवर टीका करण्यापूर्वी त्या व्यक्तीचा इतिहास जाणून घ्यावा. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घ्यावे. तसे झाल्यास वसंत मोरे हे कधीच गायकवाड यांच्यावर टीका करण्यास धजावणार नाहीत, याची नोंद मोरे यांनी घ्यावी.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत धादांत खोटे आणि तथ्यहीन वक्तव्य केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राजकारणात जातीयवाद वाढला असल्याचा जावईशोध राज ठाकरे यांनी लावला. त्यावर प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला. संपूर्ण देशवासीयांच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊ यांच्याबद्दल लिहिल्या गेलेल्या चुकीच्या व अवमानकारक इतिहासलेखनाची पाठराखण करणाऱ्या राज ठाकरे यांची जेम्स लेन प्रकरणातील भूमिका पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली. मुळात, प्रवीण गायकवाड हे घटनेच्या चौकटीत राहून कार्य करणारे आणि पुरोगामी चळवळीला दिशा देणारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे, राज ठाकरे यांचे तथ्यहीन वक्तव्य त्यांनी संवैधानिक मार्गानेच खोडून काढले.
परंतु, प्रवीण गायकवाड यांचे हे लेखन मनसेच्या खूप जिव्हारी लागलेले दिसते. त्यातूनच वसंत मोरे यांनी त्यांच्या बाबत बेताल वक्तव्य केले. प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरू न देण्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे. मोरे यांनी हा इशारा देण्यापूर्वी आपली क्षमता काय, आपण कोणावर टीका करतो, हे लक्षात घेण्याची आणि इतिहास समजून घेण्याची गरज आहे. तसे झाले असते, तर निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी तरुणांची फळी उभारणाऱ्या प्रवीण गायकवाड बद्दल बोलण्याचे धाडस त्यांनी केले नसते.
हे पुणे आहे. सुसंस्कृत अशी पुण्याची ओळख आहे. इथे तोडफोडीची, धमकीची भाषा कोणीही खपवून घेणार नाही. आमच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि माँ जिजाऊंबद्दल लिहिल्या गेलेल्या अवमानकारक इतिहासलेखनाचे उदात्तीकरण आणि गौरवीकरण करू पाहणाऱ्यांना पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी यापूर्वीच धडा शिकवलेला आहे. त्यामुळेच, आमच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्या राज ठाकरेंविरोधात प्रवीण यांनी घेतलेली भूमिका ही योग्यच असून, राष्ट्रवादी काँग्रेस पुरोगामी कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. शरद पवार यांच्या सामाजिक-राजकीय वाटचालीचा हा विचार आधार आहे, हे मोरे यांनी लक्षात घ्यावे.

