पुणे, : शेतक-यांची सध्याची परिस्थिती बिकट आहे. शेतकरी एकीकडे निसर्गाचा तर दुसरीकडे व्यवस्थेचा बळी पडत आहे. सध्या त्यांच्याकडे विकण्यासाठीही काही नाही. त्यामुळे शरीराचे अवयव विकण्याची बाजारपेठ जर निर्माण झाली, तर आपले अवयव विकण्यासाठी शेतकरी तेथे गर्दी करतील, असे वक्तव्य करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतक-यांच्या व्यथेवर बोट ठेवले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळातर्फे आयोजित शेतक-यांवर अधारित चित्रपटांवरील ‘चित्रपटातील बळीराजा – सावकारी पाश ते बारोमास’ या चर्चासत्रामध्ये खासदार शेट्टी बोलत होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, बारोमास कादंबरिचे लेखक सदानंद देशमुख, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, बारोमास चित्रपाटाचे निर्माते अरुण कचरे, दिग्दर्शक धिरज मेश्राम, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी या वेळी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले की, चंगळवाद्यांनी निसर्गाचा समतोल बिघडवीला आहे. मात्र, त्याचा परिणाम शेतक-यांना भोगावा लागत आहे. दुष्काळष गारपीठ, अवेळी पाऊस यांसारख्या समस्यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. राजकारण्यांबरोबरच सामान्य जनताही शेतक-यांचे दुःख समजू शकत नाही. हतबल झालेला शेतकरी आता आत्महत्या करत आहे. जर अवयव विक्रीची बाजारपेठ निर्माण झाली तर नक्कीच तो आपले अवयव विकण्यासाठी तेथे गर्दी करेल.राजकारणी, कलाकार, चित्रकार अशा अनेकांनी देशातील गरिबीचा वापर केला आहे. मात्र, गरिबी दुर करण्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही, असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. शेतक-यांच्या चळवळीला जातीचा वास लागल्याने शेतकरी शेतीच्या प्रश्नांपासून आणि अर्थकारणापासून दूर गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.