मुंबई-बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात शिवसेना रुजवली. राज्यात पक्षविस्तारासाठी बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला आधार दिला. मात्र, आता सत्तेसाठी तीच भाजप ठाकरेंच्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत महाविकास आघाडीकडूनही राज्यपालांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, निवडणुकीच्या पद्धतीबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक घेण्याचे निर्देश देता येत नाही, असे उत्तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला दिले होते. मग, राज्यपालांनी आता कोणत्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला निवडणूक घेण्याचे आदेश दिले, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला. तसेच, महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल करु किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली
लोकशाही जिवंत ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून लोकशाहीची रोज हत्या होत आहे. यासाठी भाजप नेतृत्व सर्व संवैधानिक संस्थांचा बेकायदा वापर करत आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. भाजपच्या या हुकुमशाहीविरोधात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित भाजपविरोधात लढू, असे नाना पटोले म्हणाले.ज्या पक्षाकडे जास्त आमदार असतील त्याच पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मविआमध्ये सध्या शिवसेनेकडे सर्वाधिक 66 आमदार आहेत. मात्र, बंडखोरीमुळे त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते. याबाबत मविआतील सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करु, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

