कंपनीने आरोप फेटाळले
पुणे – महापालिकेच्या कामाची त्रयस्थ गुणवत्ता तपासणी करणारी ( थर्ड पार्टी कन्सल्टंट) सत्यम कन्सल्टंट या कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, कोट्यावधी रुपयांची कामे घेऊन, चुकीचे कागदपत्र देऊन महापालिकेची फसवणूक केली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत केला.मात्र, हे सर्व आरोप कंपनीने फेटाळून लावले आहेत.
बागवे म्हणाले, कंपनीने जीएसटी, आयटी रिटर्न, कर्मचाऱ्यांचा पीएफ, वेगवेगळी पॅनकार्ड तसेच संचालकांची नावे दाखवून क्षेत्रीय कार्यालयांची कामे मिळविली. यामध्ये जाधव नावाचे दोन पुरुष व एका महिलेचे पॅन कार्ड वापरले आहे. पण त्यामध्ये देखील घोळ आहे. या कंपनीच्या कामावर दक्षता विभागाने ठपका ठेवला आहे. महापालिकेची फसवणूक करणाऱ्या या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आयुक्तांकडे केली असून, त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.

