पुणे -३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये रविवार, दि. ०५ सप्टेंबर रोजी रात्री ८.०० वाजता ‘आझादी 75 – आझादी का अमृत महोत्सव’ हा विशेष कार्यक्रम श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला. या भव्य कार्यक्रमात १६० हून अधिक कलावंत सहभागी झाले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे या क्रांतीवीरांसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभारला गेलेला महान लढा संगीत, गीते व नृत्यातून सादर केला गेला. ही भारतीय स्वातंत्र्याची संगीतमय गाथा याची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व निर्माते अशोक हांडे यांनी सादर केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेहरू, सुभाष चंद्र बोस अशा असंख्य नेत्यांच्या आठवणी तसेच क्रांतीकारांबद्दलचा आदर प्रेक्षकांमधून येणाऱ्या ‘भारत माता की जय’ का जोरदार घोषणांमधून दिसून येत होता. भव्यता आणि नेत्रदीपक प्रकाश योजना यामुळे संपूर्ण सभागृहात स्वातंत्र्याचा आणि तिरंग्याचा मूड तयार झाला होता. देश भक्तीच्या अन्य गाण्या बरोबरच सादर झालेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या कवी प्रदीप आणि लता मंगेशकरांच्या गाण्यवेळी अनेकांचे डोळे पाणावले.
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ. मीरा कलमाडी, राज्य कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेस नेते अॅड. अभय छाजेड, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, मोहन टिल्लू आदी यावेळी उपस्थित होते.