पुणे :
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी हा ‘चाणक्य मंडल परिवार ‘ या संस्थेतर्फे ‘संकल्प दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात आला . यावेळी उपस्थित विद्यार्थी ,नागरिक आणि कार्यकर्त्यांना आपल्या क्षेत्रात स्वच्छ ,कार्यक्षम आणि उत्तरदायी राहण्याची शपथ माजी सनदी अधिकारी आणि ‘ चाणक्य मंडल ‘चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी दिली .
ज्येष्ठ कलाकार प्रा रवी परांजपे ,सौ पूर्णा धर्माधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते आप्पा चोंधे ,अभ्यासक डॉ श्रीनंद बापट यांच्यासह सुमारे ५ हजार विद्यार्थी ,नागरिक ,पालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते . एम आय टी प्रशाला (पौड रस्ता ) येथे हा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी सायंकाळी झाला .
यावेळी ‘लोकशाही ‘ या विषयावर ‘जय भारत -जय जगत ‘ व्याख्यान मालेचे चौथे पुष्प गुंफताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले ,’समाजाच्या सामूहिक स्वार्थासाठी स्वतः निस्पृह ,निस्वार्थी राहून सत्याचा आग्रह ,धरणारी नागरिक शक्ती ,जर लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून उपस्थित राहिली ,तर लोकशाहीची वाटचाल अधिक समृद्ध होईल .
‘ सर्व क्षेत्रातील सुधारणांची सुरुवात स्वतः पासून करावी ,ठरवून समाजाला वेळ द्यावा ‘असे आवाहन त्यांनी केले
अविनाश धर्माधिकारी म्हणाले –
————————
भारतीय संस्कृतीत प्राचीन कालखंडात ‘सभा ‘ आणि ‘समिती ‘ या शब्दातून असेम्ब्ली बाबत उल्लेख आढळतात . दक्षिणेतील चोल साम्राज्यात ग्रामसभा होत्या . ‘चाणक्य ‘ ने ‘अर्थ शास्त्र ‘ ग्रंथात ‘प्रजेचे सुख तेच राजाचे सुख ‘ असे म्हटले आहे . राजाच्या कर्तव्याची यादी दिली आहे .
‘ प्रजेचा सांभाळ मुलाबाळाप्रमाणे करेन ‘ अशी शपथ राजाला घ्यावी लागत असल्याचे दाखले वेदात आहेत . भारतीय राजकीय विचार समृद्ध असून तो ‘शांतिपर्वा’ त भीष्माचार्यानी युधिष्ठिराला केलेल्या उपदेशात तो मांडण्यात आला आहे . राज्यकर्त्याने धर्म, म्हणजे नीतीचे पालन करावे ‘असा हा उपदेश आहे .
शिवाजी महाराजांचे ‘रयतेचे राज्य ‘ ,अष्ट प्रधान मंडळ हे लोकशाही संकल्पनेचे बीजारोपण होते .
गांधीजीनी आचरणात आणलेली ‘सत्याग्रह ‘ ही लोकशाहीवादी कल्पना जगातील अनेक नेत्यांची प्रेरणा बनली . गांधीजींचे काम आजही पूर्ण झाले नसून ते पुढे नेण्याची गरज आहे .
भारतीय लोकशाही व्यवस्थेत काळाच्या ओघात त्रुटी निर्माण झाल्या ,तरी पाच वर्षातून एकदा का होईना जनतेच्या समोर नेत्यांना जावे लागणे ,हे लोकशाहीचे सौंदर्य आहे .
या सर्व भारतीय आणि जागतिक पार्श्वभूमीवर ,सर्व परंपरांचा अभ्यास करून ,आधुनिक विचार करून प्रकट होण्याचे ध्येय्य आपण ठेवले पाहिजे . परिपूर्ण लोकशाही व्यवस्था अशक्य असून ती उत्तरोत्तर प्रभावी करता येणे मात्र शक्य आहे .
अश्रू भरल्या प्रत्येक जीवनातील अश्रू पुसणे हे खरे जीवन आहे . स्वतः च्या निवडलेल्या क्षेत्रात प्रतिभा संपन्न काम करणे ,हीच देशभक्ती आहे ‘असेही श्री धर्माधिकारी यांनी सांगितले


