पुणेः- आजही प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या आणि शिट्ट्या माझ्या कानात गुंजतात. माझ्या प्रगतीत प्रेक्षकांनी कळत नकळत खूप मोठा हातभार लावला आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मराठी भाषादिनानिमित्त आणि सिने-नाट्य सृष्टीतील विनोदी कलाकार निर्मिती सावंत यांचा षष्ट्यब्दीपुर्ती निमित्त आज बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. संवाद पुणे आणि कोहिनूर उद्योग समुह यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कोहिनूर उद्योग समुहाचे प्रमुख कृष्णकुमार गोयल आणि डाॅ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, सचिन ईटकर तसेच भाग्यश्री पाटील, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्य निर्माते दिलीप जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे, नाट्य व्यवस्थापक प्रवीण बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, इतरांकरिता दुर्मिळ असलेले पुणेकरांचे प्रेम मला मात्र भरभरून मिळाले. पुण्याचा प्रेक्षक हुशार आहे. कारण मराठी भाषेतील खाचाखोचा अन्य कोणाला जास्त माहिती असणार? आपली मराठी भाषा अभिजात आहेच, तिला तो दर्जा बहाल करणे ही केवळ औपचारिकता बाकी आहे. विविध शब्द, प्रतिशब्द, शब्दांच्या छटा, द्विअर्थी शब्द अशा अनेक बाबतीत मराठी भाषा समृद्ध आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपट आणि मालिकांपेक्षा मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकरण्यास मी अधिक प्राधान्य देतो.
यावेळी बोलताना निर्मिती सावंत म्हणाल्या की, आज माझा जो विशेष सत्कार झाला, त्याचा आनंद आहेच, परंतू, आज मला साठ वर्षेेे पूर्ण झाल्याचे ‘बोंबलून’ सांगितले आहे, त्याचेहीकौतुक आहे. मराठी भाषा जगावी, टिकावी यासाठी आम्ही कलाकारांनी जी जबाबदारी घेतली आहे, त्याला प्रेक्षकांनी पण वेळोवेळी प्रतिसाद देऊन मराठी संवर्धनाचे मोलाचे कार्य केले आहे.
यावेळी बोलताना डॉ. पी.डी. पाटील म्हणाले की, मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीला ज्या कलाकारंनी चांगले दिवस मिळवून दिले, त्यात अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये राज्याच्या विविध भागातील मराठी कलाकारांचे योगदान मोलाचे आहे.यावेळी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राला अशोकमामांनी खळखळून हसवले आहे. अशोकमामा हे मराठी चित्रपट सृष्टीतील अमिताभ बच्चन आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सरकारी कामकाज, न्यायालयीन कामकाज मराठीतून व्हाव, अशी मागणी मी करीत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी केले.

