मुंबई-राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्याप्रकरणी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. पवारांच्या घरावरील हल्ल्याशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्या घरी काही वेळापुर्वी पोलिस पोहचले त्यानंतर त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांची चौैकशी केली. चौकशीनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गुणरत्न सदावर्तेच्या भाषणामुळे शरद पवारांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला असे पोलिसांचे म्हणणे आहे पोलिसांनी क्लिप पाहिल्यानंतरच सदावर्तेवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले . 107 आंदोलकांच्या स्टेटमेंटमधून महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रात्री सदावर्तेंना अटक करण्यात आली आहे.
चिथावणीखोर भाषण कुणी दिले? – उपमुख्यमंत्री
आंदोलकांची दिशाभूल झाल्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने जे काही सांगितले ते परबांनी केले. संपात गुलाल उधळला पेढे वाटले आणि आज पवारांच्या घरासमोर लोक आले. कशामुळे हे घडले, कुणी चिथावणीखोर भाषण दिले असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पोलिस ठाण्यात होणार चौकशी
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर सदावर्ते सातत्याने शाब्दिक वार करीत होते. या हल्ल्याचा कट त्यांनी आखला का याची चौकशीही केली जाणार आहे.
गृहमंत्र्यांनी सांगितले होते की, यामागे सूत्रधार कोण आहेत याचा आम्ही शोध घेऊ. पवारांच्या घरावर आंदोलन करणारे सर्व आंदोलकच होते, त्यात एकही नेता नव्हता. आंदोलनात नेता नाही असे होऊ शकत नाही असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्या धर्तीवर गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी झाली असून त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शरद पवार बदला घेत आहेत – जयश्री पाटील
पोलिस घरात घुसले त्यांनी गुणरत्न सदावर्तेंना घेऊन गेले. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांना कर नाही त्याला डर काय असे म्हणाल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले. तर मी बेडरूममध्ये होते तेव्हा कपडे बदलत होते, महिला पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. असे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना शरद पवार बदला घेत आहेत असा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. तर माझ्या जीवाला, माझ्या पतीच्या आणि मुलांच्या जीवाला धोका आहे असे वक्तव्य जयश्री पाटील यांनी केले आहे. माझा खून झाला, तर दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असे वक्तव्य पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे.
माझ्या पतीला काही झाले तर पवार जबाबदार – जयश्री पाटील
सरकारची दादागिरी, सरकारचा जुलुम आहे. माझ्या पतीच्या जीवाला काही झाले तर शरद पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असेही जयश्री पाटील यांनी सांगितले. कोणतीही नोटीस न देता बेकायदेशिररित्या त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

