पुणे-एका ब्रेन डेड रुग्णांचे यकृत आज नाशिक येथून ग्रीन कॉरीडोर चा उपयोग करून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे आणण्यात आले. ज्युपिटर हॉस्पिटलची टीम हे यकृत नाशिकहून घेउन दु ४ वाजून १८ मिनिटांनी निघाली व ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली. ग्रीन कॉरीडोर हे नाशिक पासून पुण्यापर्यंत तयार करण्यात आले होते. या ग्रीन कॉरीडोर मार्फत यकृत केवळ ३ तासात पुण्यात पोहोचले. सर्व सामान्यपणे या प्रवासासाठी ६ तास लागतात.
नाशिक येथील व्यक्तीला रोड ट्राफिक अपघातात मरण पावल्याने ऋषीकेश हॉस्पिटल नाशिक येथे २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले परंतु रुग्णांने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. काही आवश्यक चाचण्या केल्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता डॉक्टरांनी रुग्णास ब्रेन डेड घोषित केले ऋषीकेश हॉस्पिटल नाशिक च्या मेडिकल टीमने ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयव दाना संदर्भात समुपदेशन केले व त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.
ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथील यकृत तज्ञांनी त्वरित नाशिक येथे जाऊन ऑर्गन रिट्रीव्हलची प्रक्रिया आज दुपारीच पूर्ण केली. पुणे व नाशिक येथील वाहतूक पोलीसाच्या सहकार्यामुळे ग्रीन कॉरीडोर द्वारा नाशिक पासून पुण्या पर्यंत यकृत केवळ ३ तासात आणता आले.याविषयी बोलताना ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ञ डॉ गौरव चौबळ म्हणाले, कुटुंबाने अवयव दान करण्यासाठी एक उत्कृष्ट निर्णय घेतला ज्यायोगे या प्रक्रियेचा लाभ घेत असलेल्या सर्व रुग्णांच्या जीवनाचे जतन करण्यात मदत झाली आहे. डॉक्टर आणि रुग्ण कुटुंब याबद्दल कृतज्ञ आहेत
ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ञ सोमनाथ चटोपाध्याय म्हणाले की, “ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या यकृत दानाचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अवयव दानाद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नवे जीवन देऊ शकते. एक व्यक्तीच्या अवयव दानमुळे जवळपास नऊ लोकांचे प्राण वाचू शकतात. अवयव दाना बाबतीत जनजागृकता वाढवण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटल प्रयत्न करीत आहे.”


