पुणे- कर्वेनगर व सनसिटी सिंहगड रोडला जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यासाठी दुधाने कुटुंबाने १३ गुंठे जमीन पुणे महापालिकेच्या स्वाधीन केली असल्याचे जाहीर केले आहे .
या संदर्भात स्वप्नील दुधाने यांनी असे म्हटले आहे कि ,’आपण प्र. क्र. ३१ मधील कर्वेनगर व सनसिटी सिंहगड रोडला जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. हा पूल सत्यात उतरावा, यासाठी दुधाने कुटुंबियांकडून तब्बल १३ गुंठे जमीन पुणे मनपाला सुपूर्द करण्यात आली आहे. या पुलाचे कामाबाबत आज पुणे मनपाच्या प्रकल्प विभागाच्या मुख्य अधीक्षक अभियंता शिर्के मॅडम यांची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष ठिकाणी व्हिजिट घेण्यात आली. या व्हिजिटदरम्यान पुलासाठी येणारा एकूण खर्च, पुलाची आखणी, या विकासकामाची सद्यपरिस्थिती आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी लक्ष्मीताई दुधाने यांच्या लोकप्रतिनिधी या नात्याने पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा पूल ठरावा, अशा पद्धतीने या पुलाची डिजाईन असावी तसेच भविष्यातील वाहतूक प्रश्नांचा विचार यावेळी केला जावा, अशी विनंतीवजा सूचना करण्यात आली. याचप्रसंगी येणाऱ्या मनपा अंदाजपत्रकात या पुलासाठी १० कोटी रुपये असा निधी प्राथमिक स्वरूपात उपलब्ध करून घ्यावा आणि तशा प्रकारची निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पुलामुळे दोन महत्त्वाची उपनगरे जोडली जाणार असून यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे, तसेच या पुलामुळे भविष्यातील अनेक वर्षांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे असेही स्वप्नील दुधाने यांनी म्हटले आहे.

