मुंबई-क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 4.45 वाजता निकाल दिला. आरोपींच्या जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ASG अनिल सिंग यांनी एनसीबीच्या वतीने युक्तिवाद केला.
आर्यनला जामीन मिळाल्यास पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते, असे ते म्हणाले. एएसजीने सांगितले की, आर्यन गेल्या काही वर्षांपासून नियमित ड्रग्ज घेत आहे. ते अनेक लोकांना ड्रग्ज पुरवत असल्याचे रेकॉर्ड दाखवतात. सापडलेल्या अमली पदार्थांच्या प्रमाणावरून तो अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी न्यायालयाने म्हटले होते की, जर सरकारी वकिलांनी तासाभरात युक्तिवाद पूर्ण केल्यास गुरुवारीच या प्रकरणावर निर्णय देता येईल. आज सुनावणीचा हा तिसरा दिवस होता. यापूर्वी दोन दिवस झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यनसह जामीनासाठी त्याचा मित्र अरबाज मर्चंट यासह मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पुर्ण करण्यात आला.
आर्यन खानची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला होता की, अटक वॉरंटमध्ये वास्तविक आणि योग्य कारणांचा उल्लेख नसल्यामुळे अटक घटनात्मक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे. मर्चंटची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मंगळवारी याच प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना विशेष एनडीपीएस कोर्टाने दिलेल्या जामीनकडे लक्ष वेधले.
त्यानंतर आज तपास यंत्रणा आणि सरकारी पक्ष या नात्याने एनसीबी आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमके काय होते. हे पाहणे अति महत्वाचे ठरणार आहे.
आतापर्यंत काय झाले?
2 ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण 8 लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना 26 ऑक्टोबर रोजी दोन आरोपींना मनिष राजगरिया आणि आविन साहू जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

