मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अलिबाग कोर्टाकडून अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयांनी कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक केली गेली आहे. यानंतर त्यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आलं. अन्वय नाईक यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या राहत्या घरी अलिबागमध्ये आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याने अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली असा आरोप नाईक कुटुंबियांकडून केला गेलाय.
अर्णब गोस्वामी यांची दुसऱ्यांदा मेडिकल टेस्ट केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरवात केली गेली. आता अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबईत कलम ३५३ अंतर्गत आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांसोबत गैरवर्तन करणे, या आरोपात अर्णब गोवामी यांच्याविरोधात मुंबईतील लोअर परळमधील ना म जोशी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

