नवी दिल्ली, 3 एप्रिल 2022
भारतीय लष्कराने 3 एप्रिल 2022 रोजी आर्मी मेडिकल कोअरचा 258 वा स्थापना दिवस साजरा केला. “सर्वे संतु निरामया” म्हणजे “सर्वजण आजार आणि अपंगत्वापासून मुक्त होऊया” हे या कोअरचे ब्रीदवाक्य आहे. युद्धजन्य परिस्थिती नसताना आणि प्रत्यक्ष युद्धादरम्यान दोन्ही वेळेस संरक्षण दलांना आरोग्य सेवा, परदेशी मोहिमांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक दलांना आणि नागरी अधिकार्यांना आपत्ती व्यवस्थापनादरम्यान वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविड विरुद्धच्या लढाईत ही शाखा आघाडीवर असून देशासाठी निःस्वार्थ आणि उत्कृष्ट सेवा तिने बजावली आहे.
यावेळी, सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे महासंचालक व्हाईस अॅडमिरल रजत दत्ता आणि वैद्यकीय सेवा (लष्कर) महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजित सिंग आणि वैद्यकीय सेवा महासंचालक(नौदल) आणि (वायु) यांनी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

