कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुलांकडून भंडाफोड?
पुण्यात मेट्रोचा मनमानी कारभार नियोजनाशिवाय व परवानग्या न घेता काम सुरु महापालिकेला ठेवले अंधारात ..
मेट्रोचा मंजूर केलेला प्लॅन त्वरित जाहीर करावा
पुणे- शहराच्या मेट्रो प्रकल्पाचे गेली दोन वर्ष काम सुरू असून या कामाचे नियोजन करून त्याचा प्लॅन मंजूर केला आहे का? असेल तर त्यानुसारच हे काम चालू आहे काय? याचा खुलासा पुणेकर जनतेला आयुक्तांनी करणे आवश्यक आहे. किंबहुना तो प्लॅन मंजूर न करताच मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे का? असे असल्यास ही गंभीर बाब असून आयुक्तांनी त्याबाबत तातडीने खुलासा करावा. तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन करून त्यासाठी कोणता प्लॅन मंजूर केलेला नसेल तर मेट्रोचे काम पूर्णपणे थांबवून आवश्यक असलेला प्लॅन व परवानग्या घेऊनच मेट्रोचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी आयुक्तांना केली.
ते म्हणाले, गेल्या काही काळात मेट्रोचे काम चालू असताना अनेकदा मार्गातील बदल व स्टेशन मधील बदल अनुभवास येत आहे. त्यात पुणेकर जनतेला कोठेही विश्वासात घेतले जात नाही. मेट्रो प्रकल्प काहीही करून पूर्ण करायचा हे धेय्य असणे ठीक आहे. मात्र त्याचे कोणतेही नियोजन नसेल व त्यास कोणतीही मान्यता नसेल तर मार्ग बदलणे,स्टेशन बदलणे हे कसे शक्य होते. तसेच मुंबई मेट्रोच्या कामात कालच अंधेरीमध्ये एक युवतीचा बळी गेला.असे अपघात पुण्यातही घडले तर त्यास जबाबदार कोणाला धरायचे.पुणे महानगरपालिकेला, पुणे मेट्रोला की, संबंधित ठेकेदाराला व त्याची नुकसान भरपाई कोण देणार. असे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे आहेत. प्रामुख्याने मेट्रो ही पुणेकरांची जीवन वाहिनी बनणार असे जे भासवले जाते ते अयोग्य आहे. पुण्यात मेट्रोचा वापर हा अल्प प्रमाणातच राहणार आहे. मुंबई सारख्या ठिकाणी किंवा लांब अंतर असलेल्या ठिकाणी मेट्रोचा वापर योग्य आहे. मात्र मध्य पुण्यात मेट्रो चालवणे कधीही शक्य होणार नाही.व त्याची गरजही नाही. कात्रज ते पिंपरी-चिंचवड अश्या लांब ठिकाणी जाणाऱ्यांनाच मेट्रो उपयोगी पडेल हे मान्य केले. तरी ठीक ठिकाणी ज्या पद्धतीने कामे चालू आहे. त्याचे सुसूत्रीकरण करून पुणेकरांना विश्वासात घेऊन मेट्रोचा मंजूर केलेला प्लॅन हा जनतेसमोर प्रदर्शित केला गेला.तर त्यानुसार काम होत आहे, की नाही हे पाहणे देखील सोयीचे होईल. मात्र आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय अशी अवस्था मेट्रो कामाची आता होताना दिसत आहे असे आबा बागुल म्हणाले
मेट्रोचा देऊ केलेला प्लॅन व त्याच्या पर्यावरण विषयक घेतलेल्या परवानग्या जाहीर केल्यानंतर त्यात बदल करता येत नाहीत.बदल केल्यास सर्व मान्यता आवश्यक असतात. आजपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा मंजूर प्लॅन जाहीर केला गेला नाही.तसेच पर्यावरण विषयक सर्व परवानग्या घेतल्या आहेत का, हे ही दाखवले जात नाही. त्यामुळेच पुणेकरांच्या मनात संशय निर्माण झाला असून या पद्धतीने मेट्रोने मनमानी काम करणे पुणेकरांच्या हिताचे निश्चितच नाही.आयुक्त येतात, बदलले जातात.त्यामुळे कोणतेच आयुक्त मेट्रो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जबाबदारी घेऊन इथे राहील अशी कोणतीही व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे प्रशासकीय जबाबदारीचा अभाव व ठेकेदारांची मनमानी आणि मेट्रोचे कामाकडे दुर्लक्ष असे चित्र असताना मेट्रोचा मंजूर केलेला प्लॅन त्वरित जाहीर करावा व पर्यावरण विषयक घेतलेल्या सर्व परवानग्या जाहीर कराव्यात अशी मागणी मी करीत आहे. असे न केल्यास किंवा परवानग्या घेतल्या नसल्यास त्याचा आढावा घ्यावा व मेट्रोचा प्लॅन व पर्यावरण विषयक सर्व परवानग्या घेऊनच काम सुरू करावे असे न झाल्यास पुणेकरांच्या जीवाशी खेळ होईल व काँग्रेस पक्ष असे कदापि होऊ देणार नाही.त्यासाठी रस्ते अडवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा आबा बागुल यांनी दिला.
मेट्रोच्या मनमानी कारभाराविषयी महानगरपालिकेला कोणतीही कल्पना नाही. मेट्रोबरोबर महानगरपालिकेने एकाही जागेचे करारनामे अजून केलेले नाहीत. मेट्रो शहरातील मोक्याच्या जागेवर व्यावसायिक संकुल देखील उभारणार असल्याचे निदर्शनास आले आहे. व त्यात महापालिकेची भागीदारी देखील निश्चित झालेली नाही. महापालिकेने ५० टक्के भागीदारीचा प्रस्ताव मेट्रोला दिला असून तो त्यांनी मान्य केला की, कसे याबाबत खुलासा होणे अत्यंत गरजेचे आहे. अश्या विविध परवानग्या न घेता बेधडकपणे या प्राधिकरणामध्ये मेट्रो काम कसे करू शकते. असा देखील संभ्रम पुणेकरांच्या मनामध्ये झाला आहे. तरी मेट्रो प्रकल्पाची तात्काळ चौकशी करून आपण योग्यतो निर्णय लवकर घ्याल अशी खात्री असून आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी. तसेच मेट्रोचा काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे. महापालिकेने किती टक्के हिस्सा मेट्रोला द्यायचा आहे. कालावधी वाढल्यास त्याची एस्कलेशन कॉस्ट वाढते तर त्याचा देखील बोजा महापालिकीवर येणार आहे का? याची पूर्ण माहिती महानगरपालिकेच्या मुख्यसभेला देणे गरजेचे आहे.त्यामुळे या सर्व बाबींचा अहवाल करून मुख्यसभेच्या पटलावर ठेवावा व नियोजनाशिवाय सुरु असलेले मेट्रोचे काम महापालिकेच्या सर्व परवानग्या घेतल्याशिवाय सुरु न करण्याचे आदेश पारीत करावेत. असे न झाल्यास मुंबई सारखी घटना घडली तर त्यास पूर्णतः आपण जबाबदार असाल यासाठी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेऊन यावर कार्यवाही करावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली.

