- भोर मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर उद्या विशेष शिबीर.
पुणे दि.१७- भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार याद्यातील तपशीलाशी आधार क्रमांक ऐच्छिकपणे जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी भोर मतदार संघातील सर्व मतदान केंद्र स्तरावर १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारांनी आधार क्रमांक सादर करण्यासाठी नमुना अर्ज ६ ब भरून सादर करावा, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.
मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम १ ऑगस्टपासून सुरू आहे. १ जानेवारी या अर्हता दिनांकासोबतच त्यावर्षीच्या १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकास वयाची १८ वर्ष पुर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. याच कार्यक्रमांतर्गत मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करून घेत तो मतदार यादीतील तपशिलासाठी जोडला जाणार आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे फॉर्म नं.६ ब भरुन तसेच वोटर हेल्पलाईन् ॲपद्वारे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आधार जोडणी करता येणार आहे.
ऑनलाईन प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. याबाबत जनजागृतीसाठी भोर मतदार संघातील सर्व मतदान केंद्र स्तरावर १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० पासून कार्यालयीन वेळेत मतदार ओळखपत्र-आधार क्रमांक जोडणीसाठी विशेष शिबिरामध्ये मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार भोर, वेल्हा व मुळशी यांच्यासह निवडणूक नायब तहसिलदार, सर्व ५३८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सर्व तलाठी व मंडळ अधिकारी, कोतवाल हे प्रत्येकी पाच मतदारांच्या घरी भेट देऊन त्यांचे मतदार ओळखपत्र व आधार जोडणीबाबत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भोर, वेल्हा व मुळशी तालुक्यातील मतदारांनी मतदार ओळखपत्र व आधार क्रमांक यांची जोडणी करुन सहकार्य करावे. ही प्रक्रीया सुलभ आणि सहज असल्याने अधिकाधिक मतदारांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. कचरे यांनी केले आहे.