पुणे, दि:६- उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयामार्फत वजने व मापे यांचे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन न केलेल्या आणि आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनाविरुद्ध ग्राहकांनी संपर्क करुन तक्रार नोंदविण्याचे आवाहन सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र विभागाने केले आहे.
मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलिंडर वितरीत करणाऱ्या कामगाराकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास कारवाई करण्यात येते. सन २०२०-२१ मध्ये एकूण २७३ आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून त्यामध्ये रुपये २३ लाख ९२ हजार ५०० दंड वसूल करण्यात आला आहे.
ग्राहकांनी असे नियमांचे उल्लंघन होताना आढळल्यास कार्यालयाच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२/०२०-२६१३७११४, व्हॉटस ॲप क्रमांक ९८६९६९१६६६, ईमेल आयडी dclmms_complaints@yahoo.in , aclmpune@yahoo.in येथे संपर्क करुन तक्रार करावी, असे आवाहन वैध मापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.

