पुणे- कालपर्यंत ,’ कार्यकर्त्याच्या निष्ठेला किंमत आहे कि नाही ? असा सवाल करणाऱ्या कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज उमेदवारी मागे घेतल्यावर राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी समाज माध्यमांवरून ‘दाभेकर यांच्या माघारी मागील रात्रीच्या घडामोडी‘ माध्यम प्रतिनिधींशी शेअर केल्या आहेत.ज्यात काही फोटो आणि..हकीकत त्यांनी कथन केली आहे…ते वाचा त्यांच्याच शब्दात…

श्री बाळासाहेब दाभेकर उमेदवारी अर्ज मागे घेण्यामधील अनेक नाट्यपूर्ण घडामोडी : कसबा विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार श्री बाळासाहेब दाभेकर यांनी निवडणूक अर्ज भरला होता. सदरचा अर्ज त्यांनी मागे घ्यावा यासाठी अनेक काँग्रेस नेते विनंती करीत होते. आज सकाळी 11 वाजता शिवसेनेचे श्री विशाल धनवडे, राष्ट्रवादी चे श्री अंकुश काकडे, श्री श्रीकांत शिरोळे यांनी दाभेकरांची भेट घेऊन त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली, ते आपल्या उमेदवारीवर ठाम होते. दुपारी 4 वाजता या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे प्रभारी आमदार श्री संग्राम थोपटे, श्री अरविंद शिंदे, श्री अभय छाजेड, सौ कमल व्यवहारे, श्री अजित दरेकर यांनी बाळासाहेब यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली, त्यावेळी राष्ट्रवादीचे श्री अंकुश काकडे यांना देखील तेथे बोलून घेण्यात आले, यावेळी बाळासाहेबांना सर्वांनी विनंती केली की आपण माघार घ्यावी, पक्ष आपल्यावरील अन्याय निश्चित दूर करेल, परंतु बाळासाहेबांनी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले. रात्री 11 वाजता आमदार श्री संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते श्री अंकुश काकडे यांनी बाळासाहेबांच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, आणि तेथूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्याशी श्री थोपटे, श्री धाबेकर आणि श्री काकडे यांनी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली, आणि त्यानंतर नाना पटोले यांच्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला, याच दरम्यान ही बैठक होत असतानाच भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघातील प्रभारी आमदार श्रीमती माधुरी मिसाळ आणि सभागृह नेते श्री गणेश बिडकर दाभेकरांना भेटायला आले होते, त्यांना श्री दाभेकर यांनी स्पष्ट सांगितले की मी काँग्रेसचा आहे. मी काँग्रेस पासून दूर जाऊ शकत नाही त्यानंतर या सर्वांच्या समवेत झालेल्या हास्य विनोदात मिसाळ आणि बिडकर यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.(अर्थात हे दोघे दाभेकरांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगण्यासाठी आले होते की आणखी काय होते हे मात्र समजू शकले नाही)


