पुणे-अचानक येणार्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमवावा लागणार्या घटना टाळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सीपीआर तंत्रज्ञान शिकावे जेणेकरून त्याचा फायदा आपल्याच समाजासाठी होऊ शकेल असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी पुणे शहर पोलिसांसाठी आयोजित सी. पी. आर’ प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. ह्या प्रसंगी पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक, पुणे पोलीस सह आयुक्त श्री रवींद्र कदम, पुणे अपर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, लारडेल मेडिकल चे पुष्कर इंगळे, डामेनिक मॅथ्यु, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. महापौर मुक्ता टिळक यांनी १२-१२ तास ड्युटी करताना पोलिसाना येणाऱ्या मानसिक व शारीरिक ताणा बद्दल सहानुभूती व्यक्त करतानाच असे जीव वाचिवण्याचे कौशल्य पोलिसांना स्वत:साठी देखील उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली.
पोलिस मुख्यालय शिवाजीनगर येथे दोन दिवस चालणार्या ह्या शिबिरात सी.पी.आर चे प्रशिक्षण नोर्वे स्थित लारडेल मेडिकल द्वारा २०० मॅनिकिन्स (डमी बाहुल्या) द्वारा पुणे शहर पोलिस दलातील सुमारे २००० पोलिस कर्मचारी आणि अधिकारी ह्यांना देण्यात येणार आहे. पोलीस सह. आयुक्त श्री रवींद्र कदम यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले व उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पोलीस उपायुक्त श्री. शेषराव सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.