शहरातील प्रलंबित प्रकल्पांसाठी शहर अभियंता बरोबर खासदार शिरोळेंची आढावा बैठक
पुणे– शहरातील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी शहर अभियंता श्रीनिवास बोनाला ह्यांच्या समवेत नुकतीच एक बैठक घेतली. ह्या मध्ये शहरातील लुल्लानगर फ्लाय ओवर, कमांड हॉस्पिटल येथील अंडरपास, घोरपडी येथील ओव्हर ब्रिज, रिव्हर फ्रंट विकास, पार्किंग साठी राखीव असलेल्या मिळकती विकसित करणे तसेच चांदणी चौक येथील कामे आदींचा विस्तृत आढावा खासदार अनिल शिरोळे ह्यांनी घेतला. ह्या बैठकीला नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे , सत्यजित थोरात, जय जोशी आदि उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लुल्लानगर फ्लाय ओवर चे काम पूर्णत्वास असून सप्टेंबर अखेरपर्यंत तो खुला होणार आहे. कमांड हॉस्पिटल जवळील अंडर पास साठी खासदार निधीतून १ कोटी देण्यात आले आहेत. उरलेल्या ३.९ कोटींसाठी बजेट करण्या संबंधी चर्चा झाली. घोरपडी येथील अतिक्रमण हटविण्याचे काम सध्या सुरु असून लवकरच तेथील कामास सुरवात होणार आहे. चांदणी चौकातील कामाचे भूसंपादन लवकर पूर्ण होणाच्या दृष्टीने बैठकीत विचार झाला.
दरम्यान National Waterways Project अंतर्गत समाविष्ट झालेल्या मुळा मुठा नदींच्या मार्गात महानगर पालिकेने केलेल्या सर्वे नुसार एकूण ४४ किलोमीटर पैकी ३३ किलोमीटर च्या नदी पट्ट्यात हि योजना राबविणे शक्य असल्याचे ह्या सर्वेतून निष्पन्न झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आगामी काळात SPV च्या माध्यमातून हा प्रकल्प कार्यान्वयित करण्याचे नियोजन असल्याचे शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.