पुणेः गीतरामायणातील गीतांचे लेखन करीत असताना ग.दि.मा एकावेळेला तीन चित्रपटांचे लेखन करीत होते. त्यांच्याकडून वेळेवर गाणं लिहून घेणे अत्यंत अवघड होतं. गाणे घेण्यासाठी आलेल्या प्रभाकर जोग यांची सायकल पंचवटीच्या दिशेने येताना दिसली की, व्हरांड्यात बसलेले ग.दि.मा त्यांना बघून म्हणायचे आला रे आला रामाचा दूत आला, आता गाण करून द्यावे लागणार. अशी गीतरामायणातील अनेक अप्रतिम गाणी त्यांनी ऐनवेळी केली आहेत, अशा अनेक आठवणींना आनंद माडगूळकर यांनी उजाळा दिला.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावतीने क्षितिज प्रस्तुत गीत रामायणायचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आले. श्रीपाद सोलापुरकर, माधवी वैद्य , राजीव बर्वे, संगीता बर्वे , मनीषा निश्चल ,संजीव वेलणकर, दिगंबर अभ्यंकर ,नारगोळकर काका, महेश सूर्यवंशी ,दिलीप हल्याळ,राहुल वंजारी,मनीषा फाटे ,गौरी पुंडलिक व कल्पना नारायण , विवेक परांजपे उपस्थित होते. गिरीश पंचवाडकर, शीतल पंडित, डॉ. आदिती पंचवाडकर-ताले व सहकारी यांनी गीतांचे सादरीकरण केले. तर पूनम सोमण (हार्मोनियम), अक्षय पंचवाडकर व शिरीष थिटे (तबला), जयंत साने (व्हायोलिन), यशोधन जटार (तालवाद्य) यांनी साथसंगत केले. पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व अजित कुमठेकर यांनी समन्वय केले.
आनंद माडगूळकर म्हणाले, लेखनासाठी गदिमांनी पंचवटीच्या अशोक वृक्षाखाली बैठकव्यवस्था केली होती. गाणी लिहीताना त्यांना वाटले की, ते दोन तीन तासात पूर्ण होईल. परंतु रात्र झाली तरी त्यांच्याकडून एक अक्षरही लिहून झाले नव्हते. रात्री माझ्या आईला जाग आली, तेव्हा तिने विचारले काय झाला का रामाचा जन्म. तेव्हा गदिमा म्हणाले, इथे काय कोणी माडगूळकर नाही तर साक्षात रामाचा जन्म व्हायचा आहे. मग ते राम जन्माचे गाणे त्यांनी पहाटेच्या आत पूर्ण केले. अशा गदिमांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. तसेच चारुकाका सरपोतदार व माडगूळकर घराण्याचे ऋणानूबंध व आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
गीतरामायणातील स्वये श्रीरामप्रभु ऐकती या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरयू तीरावर अयोध्या, दशरथा घे हे पायसदन, राम जन्माला ग सखे या गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर सावळा गं रामचंद्र, जेष्ठ तुझा पुत्र मला, स्वयंवर झाले सीतेचे, रामविण राज्यपदी कोण बैसतो अश्या अजरामर गीतांची अनुभूती रसिकांनी घेतली. कौस्तुभ गोडबोले यांनी निवेदन केले, किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. अजित कुमठेकर यांनी आभार मानले.

