औरंगाबाद –
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर औरंगाबादेतील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जात असताना शनिवारी मात्र निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवले. परिणामी, राज्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर दोन्ही गटाकडून तीव्र प्रतिक्रिया सुरू झाल्या. रविवारी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शिंदे यांच्यावर जहाल टिका केली.’दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं’; खैरेंनी असे विधान केल्याचा आरोप करत यामुळे मुख्यमंत्र्यांचे चरित्र हनन झाले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी भूमिका शिंदे गटाच्या राजेंद्र जंजाळ घेतली आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारीच पोलिस आयुक्तालय गाठत ठिय्या मांडला. खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिले, या मागणीवर ते अडून राहिले. त्यानंतर वरीष्ठ पातळीवर खलबतं सुरू झाली, त्यानंतर खैरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.जंजाळ यांची खैरें विरोधात फिर्याद घेण्यात आली. यात भारतीय दंड विधान 153 ए (1) (बी), 189, 505 (1) (ब) या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

