पुणे, 15 ऑगस्ट : मेरा रंग दे बसंती चोला… मेरे देश की धरती सोना उगले… दिल दिया हैं जान भी देंगे… यासह अनेक देशभक्तीपर गाणी, स्केटिंग, सायकलिंग आणि ढोल ताशांच्या गजरात मुकुंदनगर जैन संघाच्या वतीने आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुकुंदनगर ते दादावाडी जैन टेंपल पर्यंत ही शोभायात्रा निघाली.
आमदार माधुरी मिसाळ व सुभाष राणावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रेस प्रारंभ झाला. इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच अशा प्रकारची भव्य शोभायात्रा निघाल्याचे दादावाडी जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी यावेळी सांगितले.
शोभायात्रेमध्ये रंगीबेरंगी सजावट केलेल्या घोडागाडी, रथ, व्हेंटेज कार आणि आपल्या देशाची विविधता दर्शवणारी वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने महिला व युवा पिढी उत्साहाने सहभागी झाले होते. सुमारे तीन हजार नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी प.पू. गुरुदेव जे पी म.सा., मुकुंदनगर जैन संघ व दादावाडी जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, राजेश शहा, इंदर जैन, सचिव अचलदास पालेशा, सहसचिव ललित जैन, कोषाध्यक्ष हसमुख बाफना, भंवरलाल जैन, जयप्रकाश ललवाणी, सुरेश ललवाणी, महेंद्र रांका, महेंद्र राठोड, संपत जैन, संपत नहार, विमल संघवी, राजु लुंकड, जैन कुशल मंडळाचे सर्व सभासद आदी मान्यवर देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
यावेळी पाच वर्षाच्या लहान मुलाने स्वातंत्र्याचे महत्व सांगितले. तसेच, राजेश शहा चोखावाला यांच्या हस्ते पूजन करून झेंडावंदन झाले. संपत जैन यांनी सूत्रसंचालन केले.
देश व्यसनमुक्त व हिंसामुक्त होवो
“स्वातंत्र्याच्या अमृतमहत्सवानिमित्त पुणे शहरातील मुकुंदनगर जैन संघाने दादावाडी जैन मंदिरापर्यंत शोभायात्रा काढली. यामधून जनजागृती अभियान राबवण्यात आले. आपला देश व्यसनमुक्त आणि हिंसा मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून या शोभायात्रातून जनजागृती करण्यात आली. याबरोबरच विश्र्वशांती संदेशदेखील देण्यात आला. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकास सुखी, समृद्ध आणि वैभव संपन्न शांतीमय आयुष्य लाभो याच आजच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा आहेत.”
– गुरुदेव जे पी म.सा.
सर्वांचे आयुष्य आनंदी होवो
“स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय हा खूप आनंदाचा क्षण आहे. आपण सर्वांनी मिळून तो साजरा केला पाहिजे. त्यासाठीच प.पू. गुरुदेव जे पी म.सा. यांच्या मार्गर्शनाखाली ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सर्व नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले असून सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो याच शुभेच्छा!”
- ओमप्रकाश रांका