गायिका अमृता फडणवीस आणि ‘आशिकी २’ फेम संगीतकार जीत गांगुली नेमका कोणाचा व कशासाठी ‘पाठलाग’ करतायेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ? त्यांचा हा ‘पाठलाग’ डाव या आगामी मराठी सिनेमासाठी आहे.
रोज रोज पाठलाग सावली असेल ही अनोळखी
दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ती कोणाची
असे बोल असलेल्या या गीताचे रेकोर्डिंग नुकतेच संपन्न झाले. नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डाव ची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
डाव या सिनेमातील ‘पाठलाग’ हे थ्रिलर सॉंग गायिका अमृता फडणवीस यांनी गायलं असून जीत गांगुली यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. संगीतकार जीत गांगुली यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. रोमांचकारी भयाने खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाचे हे शीर्षक गीत मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. या गीतासाठी ‘जॅझ’ पीसचा वापर केल्याने हे गीत आशयातील गूढता आणखीन वाढवते.
जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांना हे गीत एक थरारक अनुभव देईल, असा विश्वास गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. अमृता यांनी ज्या खुबीने हे गीत गायलं आहे ते अंतर्मनाचा ठाव घेईल असा विश्वास संगीतकार जीत गांगुली व्यक्त करतात. सोबत मराठी चित्रपटासाठी संगीत देण्याचा आनंद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांच्या मते हे गीत तसेच हा सिनेमाही प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा असेल.
डाव या थरारपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनी लिहिली असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत. मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.