सूर, ताल, लयातून पं. आजाद यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा
पुणे – दोन भिन्न स्वररयंत्रातून उमटणारा पद्मभूषण पं राजन साजन मिश्रा यांचा एक मधुर स्वर, विशाल कृष्ण यांचा मनमोहक पदन्यास आणि ‘वाह आजाद..’अशी रसिक प्रेक्षकांची सहज दाद मिळणारी पं अरविंदकुमार आजाद यांची तबल्यावरील थाप अशा संगीतमय वातावरणात काल (बाल) गंधर्व दरबार अक्षरशः न्हाऊन निघाला. निमित्त होते तालायनतर्फे आयोजित केलेल्या उन्मुक्त मैफलीचे.
बनारस घराण्याच्या वादन कलेचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविणारे पं. किशनमहाराज यांचा ९५ वा स्मृतिदिन तर परंपरेत राहून नाविण्याचा शोध घेणारे प्रसिद्ध तबलावादक पं अरविंदकुमार आजाद यांचा ५० वा जन्मदिवस या औचित्याने तालयन म्युझिक सर्कलतर्फे झालेली मैफल रसिक पुणेकरांच्या पसंतीस उतरली. यावेळी बनारस घराण्याच्या कलावंतांकडून ‘उन्मुक्त’ कलेची उधळण झाल्याचा स्वानुभव उपस्थित प्रेक्षकांना आला.
पं. सीतारादेवी यांचा वारसा आणि आशीर्वाद लाभलेले विशाल कृष्ण यांनी ‘देवी सुरेश्वर भगवती गंगे’ या रचनेने मैफलीची सुरुवात केली. सदाबहार ताल तीन ताल सादर करताना त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. पं किशनमहाराज, पं गोपीकृष्ण, पं सीतारादेवी यांनी रचलेल्या बंदिश सादर करताना त्याला खास विशाल कृष्ण ‘टच’ देत कथकला लाभलेल्या असीमतेचे वरदान त्यांनी आपल्या लयकारीतून उलगडले. कृष्ण गत, सखी अर्थात घुंगट गत या माध्यमातून नृत्याबरोबरच अभिनयाचेही दर्शन त्यांनी प्रेक्षकांना घडविले. खास चक्राकार शैलीतून विशाल कृष्ण यांनी सादर केलेल्या नृत्यास रसिक प्रेक्षकांची विशेष दाद लाभली. त्यांना सुरंजन खंडाळकर (गायन), देवेंद्र देशपांडे (हार्मोनियम), रोहित वनकर (बासरी) तर पं. अरविंदकुमार आजाद (तबला) यांनी समर्पक साथ दिली.
बनारसचे संस्कृती आणि कलेसोबत जवळचे नाते आहे. हे नाते आपल्या सुमधूर स्वरातून पं राजन साजन मिश्रा यांनी उलगडले. राग गोरख कल्याण राजन साजन यांच्या ख्याल गायकीतून श्रवण करताना अधिकच सुंदर भासत होता. ‘पार करो मोरी नाव’ ही बंदिश त्यांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कधी अवकाशात स्वच्छंदी विहार करणारी लयकारी, तर कधी भारदस्त आवाजात खर्जातून थेट तार सप्तकाचा प्रवास घडवणारी सुरेल अदाकारी… कधी गुरुजनांना सुरेल भेट तर कधी त्यांच्या आठवणींना उजाळा अशा वैविध्यपूर्ण गायकीतून पं राजन साजन मिश्रा यांनी पं गिरीजादेवी, पं किशनमहाराज यांना स्वरांजली अर्पण केली. तर पं गिरीजादेवी यांच्या स्मरणार्थ भैरवी सादर करुन त्यांनी आपल्या गायकीची सुरेल सांगता केली. यावेळी त्यांना धरमनाथ मिश्रा (संवादिनी), मोहन दरेकर आणि सुहास गोरे (तानपुरा), अरविंकुमार आजाद (तबला) यांनी साथसंगत केली.
यावेळी पं आजाद यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवर कलावंतांनी दिलेल्या शुभेच्छा तसेच गानसरस्वती महोत्सवात गिरीजादेवी यांनी सादर केलेली भैरवी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, उस्मान खान, फैयाज हुसेन, रघुनंदन पळशीकर, पं लालजी श्रीवास्तव यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.
पं अरविंदकुमार आजाद यांना मानपत्र व तुळशीचा हार देऊन विशेष सत्कार समस्त रसिकांच्या वतीने यावेेेळी करण्यात आला. तसेच ‘उन्मुक्त’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा निवेदक आनंद देशमुख आणि नीरजा आपटे यांनी समर्थपणे सांभाळली. ताल, सूर आणि लयाच्या साक्षीने रंगलेली उन्मुक्त मैफल रसिकांसाठी जणू सांगीतिक मेजवानीच ठरली.