पुणे : ते सादर करत असलेली प्रत्येक कलाकृती रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळवत होती, घड्याळाचे काटे पुढे सरकत होते परंतु त्यांनी मंच सोडूच नये असे भाव प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरेतून स्पष्टपणे व्यक्त होत होते. दोन अंग होते पण नृत्य मात्र एकच सादर होत होते. ते आले, नाचले आणि त्यांनी रसिकांना जिंकलं. प्रकृति नृत्यालयातर्फे गुरू रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ संवेदन मैफल भरविण्यात आली होती. यावेळी प्रथमच पुण्यात सादरीकरण केलेल्या गौरव मिश्र आणि सौरव मिश्र या जुळ्या बंधूंनी आपल्या कथक नृत्यविष्काराने रसिकांची मने जिंकली. तर आपल्या सुरेल गायकीतून पद्मभूषण पं छन्नूलाल मिश्र यांनी मैफलीस एका वेगळ्या उंचीवर नेले. अनेक भाव उलगडणारा त्यांचा मधुर स्वर रसिकांना विलक्षण कलेची अनुभूती देऊन गेला.
गुरू रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये तसेच प्रकृति नृत्यालयाच्या शिष्या यांच्या नृत्य सादरीकरणाने मैफलीस आरंभ झाला. कथक परंपरेनुसार झपताल त्यांनी सादर केला. रोहिणीताईंची सुंदर रचना असलेले ‘कैही कारण सुंदर हात जलो’ हे ‘मुग्धाभाव’ दर्शविणारेे नृत्यकाव्य नीलिमा अध्ये यांनी हळुवारपणे उलगडले. वाद, विवाद, सुसंवाद या तिगलबंदीने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली.
त्यानंतर पं. सितारादेवी यांचा वारसा लाभलेले बनारस घराण्याचे युवा नर्तक गौरव मिश्र आणि सौरव मिश्र यांचे कथक सादरीकरण झाले. अतिशय उत्साहवर्धक आणि उर्जायुक्त त्यांचे नृत्य पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पदन्यास आणि अभिनयाच्या सुरेख मिलाफातून त्यांनी शिवतांडव व शिवस्तुती सारख्या सुंदर रचना प्रस्तुत केल्या. घुंगरामधून त्यांनी उमटवलेले विविध ध्वनी म्हणजे त्यांच्या कलेवरील विलोभनीय प्रभुत्वाची साक्ष देत होती. यावेळी त्यांना संदीप मिश्रा(सारंगी), मनोज देसाई (संवादिनी) आणि पं. अरविंदकुमार आजाद (तबला) यांनी सुरेल साथ दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संगीत शिरोमणी पं छन्नूलाल मिश्र यांचे गायन झाले. ते स्वरमंचावर येताच सर्व श्रोत्यांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. पं छन्नूलाल मिश्र यांनी राग ‘मारू बिहाग’ सादर केला. छोट्या छोट्या आलापातून सुरुवात करून श्रोत्यांना आपल्या मधुर स्वरांमध्ये त्यांनीे अक्षरशः खिळवून ठेवले. त्यानंतर राग मारू बिहाग मध्ये त्यांनी पेश केलेली ठुमरी म्हणजे साक्षात स्वरगंगाच. आणि या स्वरगंगेचा मिलाफ थेट श्रोत्यांच्या हृदयात. त्यांनी सादर केलेला केलेली ठुमरी, ‘दादरा ठेका’ रसिक श्रोत्यांना विशेष भावला. ‘देखो देखो कैसी करत है ये रात’ , ‘ सावरे जमुना तट छिनो मेरो हात’, ‘दिगंबर खेले मसाने मै होरी’ अशा त्यांनी गायलेल्या बंदिशीनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक शब्दाचे स्पष्ट आणि शुद्ध उच्चार, त्यातील भाव उलगडून मांडण्याचा छन्नूलाल मिश्र यांचा वेगळा अंदाज यामुळे मैफलीची रंगत अखेर पर्यंत टिकून राहिली. यावेळी त्यांना रंजना आपटे(तानपुरा), नम्रता मिश्र (गायन), अरविंदकुमार आजाद (तबला) यांनी समर्पक साथ दिली. आसावरी पाटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मंच नव्हे हे तर स्वरमंदिर
जेथे नाटक सादर होते तो मंच. भाषणे होतात ते व्यासपीठ पण जेथे सरस्वतीच्या आशीर्वादाने सुरेल स्वरांची अनुभूती घेता येते ते तर साक्षात स्वरमंदिर हे सांगतानाच भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या समवेतील आठवणींनाही पं छन्नूलाल मिश्र यांनी उजाळा दिला.