पुणेकरांनी अनुभवली सुरेल तालांची सफर
पुणे, : कॉस्मिक बीटस् इव्हेंटस् तर्फे पुण्यातील संगीत प्रेमींकरिता शास्त्रीय गायन व तबला वादन अशा दुहेरी संगीत मैफिलीचा कार्यक्रम संपन्न झाला. एस.एम.जोशी सभागृह,नवी पेठ येथे पार पडलेल्या या संगीत मैफिलीला पुणेकर रसिकांनी भरभरून दाद दिली.
या संगीत मैफिली मध्ये अमित जोशी यांनी एकल तबलावादन सादर केले. त्यामध्ये चक्रधर , रेला, परण, तुकडे, कायदा, पेशकार, रव इत्यादी तबलावादनातील प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या तबलावादनामध्ये चिन्मय कोल्हटकर यांनी हार्मोनियमवर त्यांना लेहरा साथ दिली.
याबरोबरच आरती ठाकूर-कुंडलकर यांनी रागेश्री या रागातील विलंबित रूपक आणि द्रुत तीन ताल, बलमवा मोरे आणि पिया घर नही आये या दोन बंदिशी, ओढवबागेश्री या रागातील द्रुत तीन तालाचा तराना आणि द्रुत एक ताल सादर केले. यामध्ये अमित जोशी (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी साथसंगत दिली. याकार्यक्रमाकरिता तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य प्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रसिध्द चित्रकार रवी परांजपे आदी मान्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन रंजना काळे यांनी केले.
कॉस्मिक बीटस् स्टुडीओ हा एक दृक-श्राव्य रेकॉर्डिंग स्टुडिओ असून,येथे जिंगल्स,अल्बम्स, माहितीपट,चित्रपट आदी क्षेत्रातील कामे केली जातात. दिलीप प्रभावळकर,स्वर्गीय श्रीमती जयमालाबाई शिलेदार,रवींद्र खरे आदी दिग्गज कलावंतांनी या स्टुडिओमध्ये रेकोर्डिंग केले आहे.
कॉस्मिक बीटस् इव्हेंट तर्फे हिंदी व मराठी चित्रपट संगीत,एकल व द्वंद वाद्यसंगीत तसेच फ्युजन व शास्त्रीय वाद्यसंगीत तसेच विषय आधारित संगीत कार्यक‘मांचे सादरीकरण करण्यात येते. अमित जोशी व डॉ.संजीव शेंडे आणि आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या शिष्या मीनलता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व उपक्रम घेतले जातात.