पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या गजरात आणि भाविकांनी फुललेल्या दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनानंतर झालेला नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा डोळ्यात साठविण्याकरीता भाविकांनी गर्दी केली. दत्तगुरुंच्या जयघोषाने दुमदुमलेला कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता.
शनिवारी सायंकाळी ६ वाजता श्री दत्तजन्म सोहळा झाला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करुन दिगंबरा, दिगंबरा… असा जयघोष करण्यात आला. दत्तगुरुंच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा मंदिरातून यंदा पायी काढण्यात आली.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व प्र-कुलगुरु भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते माध्यान्ह आरती करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारिणी सदस्य ऋषी पांडे, प्रख्यात कॅन्सर सर्जन डॅा. रवी कसबेकर, ईडीचे डेप्युटी डायरेक्टर डॅा. उज्ज्वल चव्हाण, ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा १२४ वे वर्ष आहे.कोविड नियमांचे पालन करुन यावेळी भाविकांनी श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले.

शनिवारी सकाळी ६ वाजता ट्रस्टचे खजिनदार राजू बलकवडे, हेमलता बलकवडे यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण व वर्षा चव्हाण, ट्रस्टचे उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, दीपक पोकळे व विद्या पोकळे यांच्या हस्ते श्री दत्तयाग पार पडला. तर, दुपारी १२.३० वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, प्र-कुलगुरु भाग्यश्री पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते माध्यान्य आरती झाली.
दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता सुरु झाले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म सोहळा पार पडला. या प्रसंगी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॅा. ऋतुपर्ण शिंदे तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त राहूल चव्हाण व सौ. रेणुका चव्हाण यांचे उपस्थित होते.
उत्सव आरती रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या तुरुंग सुधारसेवा विभागाचे महानिरीक्षक अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी व अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाली.
तसेच भाविकांच्या स्वहस्ते अभिषेकाची सुविधा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत उत्सव मंडपात करण्यात आली होती. कोविड प्रतिबंधक अनुरूप व्यवहाराच्या शासकीय नियमावलीनुसार मुखपट्टी अनिवार्य करण्यात आली. तसेच उत्सव मंडपाचे निर्जंतुकीकरण, अभ्यागतांचे प्रवेशद्वारावर तापमान मापन, इ. कार्यप्रणालीचे पालन देखील करण्यात आले.

