पुणे, 29 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत अ गटात नरेंद्र पाटील(3-32), वैभव विभुते(3-26) यांच्या सुरेख गोलंदाजीसह अनिकेत पोरवालच्या 91 धावांच्या खेळीच्या जोरावर अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या शेवटच्या सुपरलीग फेरीच्या सामन्यात अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. अँबिशियस क्रिकेट अकादमीच्या नरेंद्र पाटील(3-32), वैभव विभुते(3-26), व्यंकटेश दराडे(2-26), तनिश जैन(1-19), सचिन भोसले (1-26)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा डाव अवघ्या 33षटकात 134 धावावर संपुष्टात आला. वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे व्हेरॉक संघ 15.2 षटकात 7 बाद 82 असा अडचणीत आला. त्यानंतर किरण मोरे(41धावा) व मनोज यादव(16धावा) यांनी आठव्या गड्यासाठी 70 चेंडूत 29धावांची भागीदारी करून थोडासा प्रतिकार केला.
134धावांचे आव्हान अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 2बाद 135धावा करून पूर्ण केले. यात अनिकेत पोरवालने 61 चेंडूत 11 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 91धावा काढून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अनिकेतला सिद्धांत दोशीने 56 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 111 चेंडूत 132 धावांची भागीदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
अ गटात अँबिशियस, व्हेरॉक आणि क्लब ऑफ महाराष्ट्र या संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्यामुळे अंतिम फेरीस पात्र ठरण्यासाठी अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाला हे आव्हान 34 षटकात पूर्ण करणे गरजेचे होते व हे आव्हान त्यांनी 20 षटकात पूर्ण केले. तसेच अ गटात अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 1.1311 नेट रनरेट सरासरीच्या जोरावर अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 31 जानेवारी रोजी केडन्स क्रिकेट अकादमी विरुद्ध अँबिशियस क्रिकेट अकादमी यांच्यात पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सुपरलीग फेरी:व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 33षटकात सर्वबाद 134 धावा(किरण मोरे 41(80,3×4,1×6),मिझान सय्यद 23(30,1×4,2×6), ओम भोसले 18(19), मनोज यादव 16, पवन शहा 12, नरेंद्र पाटील 3-32, वैभव विभुते 3-26, व्यंकटेश दराडे 2-26, तनिश जैन 1-19, सचिन भोसले 1-26) पराभूत वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी: अंबिशियस क्रिकेट अकादमी: 20षटकात 2बाद 135धावा(अनिकेत पोरवाल 91(61,11×4,5×6), सिद्धांत दोशी नाबाद 40(56, 5×4, 1×6), कपिल गायकवाड 1-31, अॅलन रोडरिगेस 1-34); सामनावीर-अनिकेत पोरवाल; अंबिशियस क्रिकेट अकादमी 8 गडी राखून विजयी.
अनिकेत पोरवालची अफलातून फलंदाजी; नरेंद्र पाटील व वैभव विभुते यांची सुरेख गोलंदाजी
Date:

