ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड’ व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
पुणे : ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे (जीआयबीएफ) आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रावेळी मोरोक्को, कॉस्टरिका, अझरबैजान, नायजेरियाच्या राजदूतांनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या देशांमध्ये उद्योग विस्ताराच्या मोठ्या संधी असून, तेथील पायाभूत सुविधा, नियम, उद्योगाच्या संधीविषयी मोरोक्कोचे राजदूत मोहम्मद मलिकी, कॉस्टरीकाचे राजदूत क्लॉडीओ अनसोरेना, अझरबैजानचे राजदूत डॉ. मोहम्मद मालिकी, नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले यांच्या वतीने ख्रिस्तोफर केके यांनी माहिती दिली.
हिंजवडी येथील हॉटेल रमाडा प्लाझा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. यावेळी ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष जितेंद्र जोशी, समन्वयिका दीपाली गडकरी आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे व राजदूतांच्या हस्ते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योगावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात चारही देशांच्या राजदूतांनी त्यांच्या देशातील उद्योगांच्या संधींविषयी माहिती दिली.
चौघांचेही खास पुणेरी पगडी घालून स्वागत केल्यांनतर ते भारावून गेले. प्रसंगी मान्यवरांच्या ‘बिझनेस टायकून’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. इंडिया-मोरोक्को बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-कॉस्टरिका बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-अझरबैजान बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-नायजेरिया बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल या चार कौन्सिलची स्थापना करण्यात आली. व्यावसायिक, उद्योजक, चेंबर्स, विविध देशांचे दूतावास यांना एका व्यासपीठावर आणुन उद्योग क्षेत्राची प्रगती करण्याचा ‘जीआयबीएफ’चा उद्देश असल्याचे डॉ. जितेंद्र जोशी यांनी सांगितले. नीलकमल आंचन यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली गडकरी यांनी आभार मानले.
“प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरण, हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या मुद्यांवरही आपण भर दिला पाहिजे. कार्बन उत्सर्जन थांबवण्याच्या प्रयत्नात सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम जागतिक स्तरावरील उद्योगांना एकत्रित आणून शाश्वत विकासासाठी पुढाकार घेत आहे,” असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
मोहम्मद मलिकी यांनी भारतीय उद्योजकाना मोरोक्कोत उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. व्यापाराच्या प्रक्रिया, प्रणाली सुलभ असून, तंत्रज्ञान, उत्पादन, ऊर्जा, ऑटोमोबाईल, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा क्षेत्रात चांगल्या संधी असल्याचे नमूद केले. कॉस्टरिका हे जगभरातील उद्योजकांसाठी एक नामांकित केंद्र बनत असल्याचे क्लॉडीओ अनसोरेना यांनी सांगितले.
डॉ. मोहम्मद मालिकी म्हणाले की, आयात-निर्यात, तसेच उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी अझरबैजान चांगला पर्याय आहे. येथे गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सुलभ प्रक्रिया उपलब्ध आहे. पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध नायजेरियामध्ये जागतिक स्तरावर व्यापाराच्या मोठ्या संधी असून, कृषी, तेल, गॅस, शिक्षण, उत्पादन, जलशुद्धीकरण क्षेत्रात गुंतवणुकीला वाव असल्याचे ख्रिस्तोफर केके यांनी सांगितले.

