मुंबई- मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभिकरण केल्याचा वाद सुरू करत आता शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वर आज राजकीय हल्ले सुरु झाले. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
राम कदम जे शिवसेनेचे ठाकरे कुटुंबाचे कधी काळी जवळचे होते त्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे , शरद पवार आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करणारे ट्वीट करत या तथाकथित कबरीचे फोटो शेअर केले आहेत .एवढेच नव्हे तर दिवसभर आज त्यांनी या विषयाकडे लोकांचे लक्ष वळविले आहे त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीत मध्ये या सेनेला नाव सुचवा म्हणत 5 ऑप्शन हि दिले आहेत . 1) पेंग्विन सेना 2) याकूब बचाव सेना 3} हफ़्ता वसूली सेना 4) मुंबई लुटारू सेना 5) पनौती सेना असे हे ऑप्शन दिले आहेत .
एकीकडे भाजपाकडून यासंदर्भात शिवसेनेवर आरोप केले जात असताना शिवसेनेकडून २०१५मध्येच भाजपा सरकारच्या काळात ती कबर का बांधली गेली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना आता मेमनची कबर असलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनीच यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सुशोभिकरणाचा दावा फेटाळून लावला आहे.
याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल राम कदम यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. यानंतर कबरीवर लावलेले लाईट्स काढण्यात आले. त्यासंदर्भात भाजपाने केलेल्या आरोपांना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
आदित्य ठाकरेंचा प्रतिप्रश्न
. “ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केलं? दफन केलं गेलं तेव्हा सरकार कोणाचं होतं?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले. तसेच, “आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं आहे.” अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.“राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते. आज जे आरोप झाले ते खोटे आहेत. धार्मिक वाद निर्माण करायचं हे योग्य नाही.”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, “सत्य परिस्थिती समोर येणं गरजेचं आहे. जेव्हा त्याचं दफन झालं तेव्हा मोठी सुरक्षा दिली होती, खूप गर्दी करून दफन करणयात आलं. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं का नाही केलं? ते कब्रास्थान खासगी आहे. दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं नक्की? ही ट्रस्ट प्रायव्हेट आहे हे त्यांना माहित नाही का?” असे सवालही आदित्य ठाकरे यांनी केले.“निवडणुक जवळ आल्या आहेत असे विषय पुढे येतायत. औरंगाबादवरून देखील असे विषय पुढे येत होते शेवटी माध्यमातून सत्य समोर आलं. आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं असत. बोलायला काहीही बोलू शकतात. २०१५ मध्ये आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा आमचं किती ऐकलं जात होतं.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सुशोभिकरणाचं वृत्त चुकीचं?
दरम्यान, या सर्व वादावर ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “या बातमीत कोणतंही तथ्य नाही की याकूब मेमनच्या कबरीसाठी मार्बल, लाईट वगैरे लावण्यात आले. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं”, असं ते म्हणाले.
व्हायरल व्हिडीओ जुना?
“लाईट लावलेला जो व्हिडीओ आपण पाहात आहात, तो ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. शब-ए-बारातच्या वेळी गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या मोठ्या कब्रिस्तानातच नाही, तर सर्वच कब्रिस्तानांमध्ये हे केलं गेलं आहे”, असं स्पष्टीकरण खातिब यांनी दिलं.“याकूब मेमनविषयी आम्हाला कोणत्याही सद्भावना नाहीत. त्याने देशाचं फार मोठं नुकसान केलं होतं. आम्ही त्याच्या कबरीसाठी या सगळ्या सुविधा का देऊ? याकूब मेमनच्या कबरीव्यतिरिक्त तिथे इतर १७ कबरीदेखील आहेत. तुम्ही जाऊन पाहा. तिथे काळ्या रंगाचं मार्बल होतं. ५-७ वर्षांपूर्वी तिथे नुकसान झालं होतं. कबरीतली माती बाहेर येत होती. त्यामुळे त्यांच्या काही दूरच्या नातेवाईकांनी अर्ज दाखल केला आणि तिथे दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली”, असा दावा खातिब यांनी केला आहे.कबरीच्या बाजूला लाईट का लावले?
दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीवर लाईट का लावण्यात आले? असा प्रश्न विचारला असता खातिब यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. “रात्रीच्या वेळी जेव्हा प्रेतयात्रा येते, तेव्हा त्या भागात मृताचे नातेवाईक गोळा होतात. तिथे अंधार असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या भागात लाईट लावण्यात आले होते. याकूब मेमनच्या कबरीसाठी नाही. पण त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आम्ही त्या लाईट काढून टाकल्या”, असं खातिब म्हणाले.