पुणे-भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. यावेळी अजित पवारांसोबत विकासकामांबाबत चर्चा झाल्याचे उदयनराजेंनी सांगितले आहे.यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीत जात आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी छत्रपती शिवरायांचे ज्याप्रमाणे सर्वधर्वसमभाव हे धोरण होते तसे माझे सर्वपक्ष समभाव हे धोरण आहे, असे उत्तर दिले आणि हसले.
वाईन विक्रीचा निर्णय :लोकांनी आपापला विचार केला पाहिजे –
नुकतेच राज्य सरकारच्यावतीने वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत उदयनराजे भोसले यांना विचारले असता, ही लोकशाही आहे. या निर्णयाचा काही फायदा होणार की, नाही होणार हे निर्णय घेणाऱ्यांना विचारले तर बरे होईल. प्रत्येकाचे आयुष्य आहे, त्याने कसे वागावे हे त्याने ठरवावे. वाईन बंद करा, चालू करा, यापेक्षा लोकांनी आपापला विचार केला पाहिजे, असे यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले.
दरम्यान, या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियात एक पोस्ट लिहिली, सातारा नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्तावाद्वारे मागणी केली आहे.

