पुणे- कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना , माकप , विविध कष्टकरी आणि कामगार संघटना यांच्या संयुक्त आंदोलनाने आज पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकरली असतानाही येथेच निदर्शने करत दिलेल्या घोषणांनी अलका चौक आज दुपारी निनादून गेला. असंख्य पोलीस , सुरक्षा रक्षक जवानांची तुकडी, पोलिसांच्या गाड्या अशा ताफ्यात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते त्यात शीख समाजाचा महत्वपूर्ण सहभाग , आणि विशेष म्हणजे अत्यंत आर्त घोषणाबाजीने, काव्यात्मक घोषणांनी आजचे हे आंदोलन विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरले. शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादी चे अध्यक्ष आ. चेतन तुपे, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण , शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे ,रजनी त्रिभुवन, अविनाश बागवे, विशाल धनवडे, सुभाष जगताप ,नंदा लोणकर , अश्विनी कदम,नारायण लोणकर ,प्रकाश कदम ,अजित दरेकर ,अमित बागुल, रवींद्र माळवदकर, शेखर कपोते, बाळासाहेब अमराळे, संतोष शिंदे ,यांच्या सह , ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, कामगार नेते अजित अभ्यंकर ,नितीन पवार यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन आपल्या तीव्र भावना येथे व्यक्त केल्या .
कात्रज मध्ये प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने

आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला पाठिंबा देत नगरसेवक प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखाली कात्रज कोंढवा रोड येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रतिक कदम,प्रणव कदम, सुधीर डावखर, संजय खोपडे, सागर शेवाळे, श्रीकांत जाधव ,शडगे काका , जाधव काका, विजूदादा पवार,शिवाजी राऊत व प्रभाग क्र 38 मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
विश्रांतवाडी परिसरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला टिंगरेनगर, विश्रांतवाडी परिसरात संमिश्र प्रतिसाद लाभला. विश्रांतवाडी, विमानतळ रस्ता, धानोरी, टिंगरेनगर आदी परिसरातील काही दुकाने बंद, तर काही चालू होती.
बाणेर बालेवाडीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तरी सर्व व्यवहार सुरू
शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीने ‘भारत बंद’ची हाक दिली असली, तरी बाणेर बालेवाडी येथे सकाळपासूनच सर्व व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू होते. रस्त्यावर ही वाहणांची गर्दी पाहायला मिळाली. तर सर्व दुकानं आणि सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू होते.
व्यावसायिकांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. पण कोरोना काळात अनेक महिने दुकाने बंद होती त्यामुळे बरेच आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्यातच आज पुन्हा एक दिवस दुकान बंद ठेवण्यास या भागातील व्यवसायिक उत्सुक नाहीत. त्यामुळे या भागातील सर्व दुकाने आज सुरू ठेवण्यात आली आहेत. तसेच या बंदला शेतकरी समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षांकडून ही दुकाने सुरु ठेवण्याला कोणताही विरोध नसल्याने या भागातील व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.
बाणेर बालेवाडी येथील रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू होती. या भागातील हॉटेल सदानंदजवळ वाहतूक पोलीस तसेच चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन कडून नाका बंदी करण्यात आली होती.
धनकवडीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रेय धनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजीनगर येथील एलोरा पॅलेस जवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्या तर्फे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपप्रणित केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात घोषणा देत, विरोध प्रदर्शन करत आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचा विजय असो मोदी सरकारचा धिक्कार असो… भाजप सरकारचा धिक्कार असो… ,भाजप सरकार हाय हाय…, अशा पद्धतीने घोषणा देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिबा देण्यासाठी वारजेत आंदोलन
वारजे महामार्ग उड्डाणपुलाखाली महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. वारजे भागातील पक्षीय,समविचारी संघटना यांनी सकाळी साडेदहा वाजता निदर्शन आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेल पुणे उपाध्यक्ष जावेद शेख, सौ प्राची दुधाणे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन बराटे व शिवसेना वारजे अध्यक्ष अजय पोळ यांनी संयोजन केले.आंदोलनात विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, जिल्हा परिषद सदस्य सौ इंगळे, नगरसेवक सचिन दोडके,जावेद शेख श्रीकृष्ण बराटे, बाबा खान,एड विठ्ठल वांजळे,सौ प्राची दुधाणे या सर्वानी मत प्रदर्शन केले व निषेध आंदोलनाला मार्गदर्शन केले. सौ सायली वांजळे यांनी आभार मानले . जावेद शेख व देवेंद्र सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.या आंदोलनात पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकार हाय हाय, ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोकी वरती पाय, वापस लो, वापस लो, काला कानून वापस लो
अशा घोषणाबाजीने आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पुण्यात “किसान बाग” सुरु करण्याची माहीती जावेद शेख यानी दिली आणी शेवटी राष्ट्र गीताने सांगता करण्यात आली.

कोथरुडमध्ये बंदला संमीश्र प्रतिसाद; चांदणी चौकात निदर्शने
केंद्राने केलेल्या शेतकरी कायद्या विरोधात देशभरात बंदचे आयोजन केले आहे. कोथरुडमध्ये या बंदला संमीश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोथरुडमधील चांदणीचौक येथे निदर्शने करण्यात आली. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलका चौकात जावून निदर्शने करणे पसंद केले. मोदी सरकारचा निषेध करत चांदणी चौकात निदर्शने करण्यात आली.
मुंढवा चौकात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
केशवनगर-मुंढवा भागातील महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून या परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येवून, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंढवा येथील महात्मा फुले चौकात आपापल्या पक्षाचे झेंडे घेवून केंद्रसरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देत आंदोलन केले. महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. त्याला केशवनगर-मुंढवा परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला.

