कोणत्याही गोष्टीत तरबेज व्हायचं म्हटल की हल्ली ‘प्रोफेशनल कोर्सेस’उपलब्ध आहेत. पण 1950-51 चा काळ असा होता की जिथे असे कोणतेही प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध नव्हते. त्या काळात प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे प्रयोग होताना दिसत.सिनेसृष्टी म्हटली की या प्रयोगांना जरा जास्तच वाव मिळतो. भगवान दादांच्या आयुष्यातला पहिला सोशल सिनेमा‘अलबेला’ हाही त्या काळातला एक प्रयोगच होता. हा प्रयोग सुपरहिट ठरला आणि अलबेला तब्बल 24 आठवडे सिनेमाघरात राहिला.
हा अलबेला प्रवास सर्वार्थाने खडतर होता. याच चित्रपटातल्या एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान सगळी तयारी झाली असताना
अचानक भगवान दादांना कळले की इंडस्ट्रीतले सगळेच डान्सर राज कपूर यांच्या चित्रपटातल्या डान्सिंग सिक्वेन्ससाठी बुकआहेत. उभारलेला सेट, गीता बाली या अभिनेत्रीच्या मिळालेल्या तारखा, अशी सगळी तयारी झाली असताना हा असा पेच प्रश्न भगवान दादांच्या समोर येऊन उभा ठाकला…आता करायचे काय? बॅकग्राऊंड डान्सर्स आणायचे कुठून?
इथेच कामी आलं भगवान दादांचं प्रसंगावधान असणं…स्टंटमॅन, ऍक्शन हिरो, डान्सिंग सुपरस्टार अशी सगळीच विशेषणलाभलेल्या या अलबेल्याची प्रसंगावधानता ही तितकीच ताकदीची होती. हीच प्रसंगावधानता दाखवून आयत्या वेळेला समोरआलेल्या या अडचणीला तोंड देत भगवान दादांनी त्यांच्या प्रोडक्शनशी जोडलेल्या फायटर्सकडून डान्स करून घेतला. या
परिस्थितीला तोंड कसे द्यायचं याचा विचार करत असताना एका फायटरची वरात भगवान दादांच्या समोरून गेली आणि त्यावरातीत फायटर्सला नाचताना पाहून ही कल्पना त्यांना सूचली. आपण एखाद्या सिनेमासाठी स्टंट करण्याबरोबरच नृत्याविष्कार ही
सादर करू शकतो, यावर त्या फायटर्स चा विश्वासच नव्हता…मात्र स्टंट्स करणाऱ्या या फायटर्स कडून डान्स करून घेण्याचे धैर्यभगवान दादांनी दाखवले. आणि या अवलियाने असा काही नृत्याविष्कार या फायटर्सच्या साथीने सादर केला की त्याला पाहून
प्रेक्षागृहातील प्रत्येक रसिक त्या गाण्यावर नाचला.
1951 मध्ये झालेली हीच जादू मंगलमूर्ती फिल्मस् आणि किमया मोशन पिक्चर्स यांच्या‘एक अलबेला’या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षक पुन्हा एकदा अनुभवणार आहेत. शेखर सरतांडेल दिग्दर्शित या सिनेमात भगवान दादांच्या भूमिकेत मंगेश देसाई दिसणार आहेत तर गीता बालीची भूमिका विद्या बालन यांनी साकारली आहे. छायाचित्रदिग्दर्शन उदय देवरे यांचे असून संतोष मुळेकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.पुन्हा एकदा 1951 चा काळ नजरेसमोर उभा करणारा एक अलबेला येत्या 24 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.