पुणे- मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी आणि भाजपाविरोधी पक्षांचा विरोध होत असल्याचे दिसत असले तरी सूत्रांचे म्हणणे आहे कि’अंदर कि बात और है…अजितदादा भी साथ हैं….आणि केवळ अशा सारख्या कारणांनीच स्थानिक भाजपची नेते मंडळी अनेकदा तोंडावर पडल्याचे दिसून आले असल्याचे सांगण्यात येते आहे. नदी सुधार प्रकल्प हा पावणेसहा हजार कोटीचा प्रकल्प आहे. त्यासाठी कोरोनाची लाट असतानाही ‘रिस्क’ घेऊन महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी यांनी गुजरात दौरा करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या दौऱ्याला महापौर आणि आयुक्त मात्र जाऊ शकले नव्हते ते, पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांच्या निधनामुळे. मात्र कोरोना, सिंधूताईंच्या अंतिम संस्काराची अगदी कशाची तमा न बाळगता भाजपा,एम आय एम,आर पी आय चे पदाधिकारी या दौऱ्यावर गेले.कॉंग्रेस विरोधावर ठाम राहिली आणि राष्ट्रवादी देखील विरोध करत राहिली परंतु हा विरोध फक्त प्रसिद्धी आणि राजकारणापुरताच राहिला. प्रत्यक्षात जेव्हा कोरोना गेला ..अधिवेशने होऊ लागली, निर्बंधे सैल पडली तेव्हाही पुणे महापालिकेत पारदर्शक कारभारासाठी कोणीही प्रयत्न न करता अपारदर्शक राहील जनतेला खुली होणार नाही अशा पद्धतीची ऑनलाईन मुख्य सभा घेऊन या सभेत अगदी एकमताने या प्रकल्पाला मंजुरी दिली.विशेष म्हणजे भाजपाचे महापालिकेतील अशाच स्वरूपाच्या कारभाराचे काही विषय देत एसीबी कडे हि राष्ट्रवादीने तक्रार दिली त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा चमत्कार घडला होता.
हे सर्व राजकीय पातळीवर घडले असले तरी दुसऱ्या बाजूने मात्र नदी सुधार प्रकल्प हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आहे, यामुळे पूर पातळी आणखी वाढणार आहे. हा नदी सुधार प्रकल्प नसून केवळ बांधकाम प्रकल्प आहे. नदीला यामुळे कॅनॉल चे स्वरूप प्राप्त होणार आहे अशा तक्रारी पर्यावरण प्रेमी म्हणविणाऱ्या यांच्या चळवळीतून आजही होत आहेतच.एवढेच नव्हे तर याच प्रकल्पाच्या विषयावर ‘बड्या साहेबांनी ‘ म्हणजे खुद्द शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेतल्याचेही वृत्त झळकले आणि राज्य सरकारने या प्रकरणाची माहिती मागवून याला ब्रेक दिल्याच्या हि बातम्या झळकल्या.या सर्व पार्श्वभूमीवर पावणेसहा हजार कोटीच्या (सध्या तरी हाच आकडा आहे, पुढे कदाचित वाढत वाढत जाईल ) नदी सुधार प्रकल्पाला खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठींबा आहे कि काय ?असा प्रश्न उपस्थित होऊलागला आहे .आणि यात छोटे सरकार आणि बडे सरकार यांच्यात मतभेद आहेत काय ?हाही प्रश्न उपस्थित होताना दिसतो आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.

