मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचं ट्वीट केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी फक्त शिवसेना आणि काँग्रेससोबतच जाणार आहे. अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर काही मिनिटातच शरद पवारांनी त्यांना उत्तर दिलं.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्विट अजित पवारांनी केलं होतं. अजित पवारांच्या ट्विटला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. “भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांनी केलेलं विधान खोटं असून दिशाभूल करणारं आहे. संभ्रम निर्माण करण्यासाठी खोट्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


