पुणे-अजित पवार अजून अज्ञानी आहेत. आपल्या खात्याचे बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही अशी टीका राणेंनी केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जशास तसे उत्तर दिले आहे. पुण्यात प्रसारमाध्यामंसोबत संवाद साधताना अजित पवारांनी राणेंच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांनी काय दिले उत्तर ?
अज्ञानी म्हणाणाऱ्या राणेंना प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले की, ‘मला या गोष्टीवर जास्त चर्चाच करायची नाहीये. त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला आमचे सरकार व्यवस्थितरित्या चालवायचे आहे. ते आम्ही चालवत देखील आहोत. ते केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्यांनी त्यांचे केंद्राचे काम करावे आणि आम्ही आमचे राज्याचे काम करतो,’
काय म्हणाले होते नारायण राणे?
‘अजून अजित पवार अज्ञानी आहे. त्यांनी आपले खाते सांभाळावे. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप आणि केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार यांच्याकडून शिकावं.’अशी टीका नारायण राणेंनी केली होती.
दरम्यान अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या खात्यावर टीका केली होती. सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर उत्तर देत असताना राणेंनी आज पवार अज्ञानी असल्याची टीका केली होती. यावरच पवारांनी उत्तर दिले आहे
भविष्यातील आणखी दोन महापालिकांच्या उभारणी संदर्भात चर्चा
विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या विकास आराखड्याचे सादरीकरण खासदार, आमदारांना दाखवण्यात आले. त्यात अनेकांनी सूचना दिल्या आहेत. आणखी एक बैठक मुख्यमंत्री स्तरावर येत्या काळात होणार आहे. त्यानंतर त्यातील अनेक मागण्यांबाबत चर्चा होईल. तसेच भविष्यातील आणखी दोन महापालिकांच्या उभारणी संदर्भात देखील चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, की गावांगावांतील रस्ते रेकॉर्डवर नसतील तर नंतर नागरिक त्यासाठी जागा देण्यास टाळाटाळ करतात. कारण त्या परिसरातील जागेचे भाव नंतर प्रंचड वाढलेले असतात. परिणामी नागरिक जागा देताना विचार करतात, विरोध करतात. हा आमचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे त्याची दखल पीएमआरडीएने घ्यावी.
२३ गावांच्या आराखड्यात बदल करण्यास महापालिकेला अधिकार
पीएमआरडीने पुणे महापालिकेत समावेश झालेल्या २३ गावांबाबत आता विकास आराखडा केला आहे. मात्र, पुणे महापालिकेकडे आराखडा हस्तांतरण झाल्यावर त्यात ते बदल करू शकतात. पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी विकासाबाबत आमच्याकडून राजकारण केलं जातं नाही, याबाबत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येऊ लागली आहे. अनेक जिल्ह्यात निर्बंधात सूटही देण्यात आली आहे. परंतु नागरिक कोरोना पूर्णपणे नष्ट झाल्यासारखे वागू लागले आहेत. आता सणासुदीचे दिवस आल्याने राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सणांमध्ये काळजी न घेतल्यास पुन्हा निर्बंध लावू असा इशारा दिला आहे.
पवार म्हणाले, केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तिथे लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. एक सण मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यामुळे आता तिथे प्रचंड कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याने पुन्हा निर्बंध लावावे लागले आहेत. महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा मग निर्बंध लावावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
कोरोना वाढतोय… केंद्र आपल्याच चार मंत्र्यांना यात्रा काढायला सांगते
पवार म्हणाले, की नारायण राणे यांच्याबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. आम्हाला सरकार चालवायचे आहे. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्याचं काम करावं. एकीकडे केंद्र सरकार सांगतेय कोरोना महामारीची काळजी घ्या, गर्दी टाळा तर दुसरीकडे आपल्याच नवीन चार मंत्र्यांना ते सांगतात यात्रा काढा. त्यामुळे कोरोना वाढल्यास त्याला कोण जबाबदार आहे. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा.
…तोपर्यंत अनिल देशमुखांबाबत बोलणार नाही
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेशनकडून (सीबीआई) क्लीन चीट मिळाली आहे. अशा काही बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याबाबत मी वाचले आहे. अनेक चौकश्या होत असतात. त्या-त्या वेळी सगळेजण चौकशीसाठी सहकार्य करत असतात. मात्र, देशमुख यांच्याबाबत जोपर्यंत मला अहवाल मिळत नाही. तोपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

