पुणे- २०२० या वर्षाला निरोप दिल्यानंतर ,नव्या वर्षाचे स्वागत करताना पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुणे महापालिकेतील नव्या इमारतीच्या नव्या सभागृहात एकत्रित येत आहेत . निमित्त आहे .भामा आसखेड योजनेचे ….ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आणि करोना संसर्ग या दोन कारणांमुळे या योजनेचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी (१ जानेवारी) महापालिके च्या सभागृहात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते दुपारी ४ वाजता एकाच व्यासपीठावर दिसतील.२०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २०२१ हे अंतिम वर्ष अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते आहे . पुणे महापालिका जिंकण्यासाठी आता हे दोन्ही नेते आज एकमेकांना कशा पद्धतीने ‘सलामी ‘ देणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांशी आपल्या खास शैलीत खा. गिरीश बापट , आ. चंद्रकांतदादा पाटील कसा संवाद साधतील हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भामा आसखेड योजनेचे काम कोणत्या पक्षाच्या सत्ता काळात झाले आणि कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात वाद झाला होता. मात्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावर तोडगा काढीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेता, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. आमदार, खासदार, पक्षांचे शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे पाणी नव्या वर्षांत मिळणार आहे. पूर्व भागातील १२ लाख लोकसंख्येला या योजनेतून पाणीपुरवठा के ला जाणार असून योजनेचे औपचारिक उद्घाटन १ जानेवारीला (शुक्रवारी) होणार आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिके ने पूर्ण केलेली ही योजना भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कळस, धानोरी, वडगांवशेरी, चंदननगर, संगमवाडी, येरवडा, लोहगांव, विश्रांतवाडी या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना आहे. योजनेची कामे पूर्ण झाली असून जलवाहिन्यांची तांत्रिक चाचणी महापालिके कडून सुरू करण्यात आली आहे.
अंतिम चाचणी पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्यापर्यंत पूर्व भागाला योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेमुळे लष्कर जलकेंद्रावरील ताण कमी होणार असून पूर्व भागाला होत असलेला अपुरा, अनियमित पाणीपुरवठय़ात सुधारणा होणार आहे.
भामा-आसखेड धरणातून २.६४ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी महापालिका बंद जलवाहिनीद्वारे उचलणार असून त्यासाठी सहा टप्प्यात मोठय़ा क्षमतेच्या साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे.
या योजनेला सन २०१३ मध्ये मान्यता देण्यात आली. तत्कालीन केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्निमाण योजनेअंतर्गत योजनेसाटी ३८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. राज्य शासनाकडूनही योजनेसाठी अर्थसाहाय्य करण्यात आले तर उर्वरित रक्कम महापालिके कडून खर्च करण्यात आली. पुनर्वसनाचा मुद्दा, प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई, सिंचन पुर्नस्थापना खर्च अशा अडचणींमुळे योजनेचे काम रखडले होते. मात्र योजनेची सर्व कामे आता पूर्ण झाल्यामुळे मार्च महिन्यापासून पूर्व भागातील १२ लाख लोकसंख्येला नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

