पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय हे पुणेकरांसाठी एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणेकरांना राज्य सरकारशी संबंधित कामकाजासाठी निवेदने देणे, पत्रव्यवहार करणे सोयीचे जावे, यासाठी पक्ष कार्यालयात तशी सोय करण्यात आली आहे. ९ ऑगस्टपासून सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही निवेदने स्वीकारण्यासाठी अजितदादांचे स्वीय सहाय्यक स्वत: पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे, पुणेकरांना निश्चितच त्याचा लाभ होणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे दिली .
ते म्हणाले,’पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय हे केवळ पक्ष कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर पुणेकर नागरिकांसाठीही हक्काचे व्यासपीठ बनावे, अशी अपेक्षा आदरणीय अजितदादा यांनी या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली होती. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पक्ष कार्यालयाने निश्चितच गेल्या महिना-दीड महिन्यात या अपेक्षेच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. ती यापुढेही कायम राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्य सरकारशी संबंधित कामांसाठी राज्य सरकार व नागरिक यांच्यात एक दुवा म्हणून पक्ष कार्यालय कार्यरत राहणार आहे. अजितदादांच्या सूचनेनुसार अजितदादांचे स्वीय सहाय्यक ९ ऑगस्टपासून दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. या वेळी सरकारशी संबंधित कामकाजाबाबतची निवेदने, पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, सार्वजनिक कामांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. या उपक्रमाचा निश्चितच पुणेकरांना वेळ आणि श्रमाच्या दृष्टीने फायदा होणार आहे.
तरी, पुणेकर नागरिकांनी राज्य सरकारशी संबंधित सार्वजनिक कामांबाबत या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी पक्षाचा शहराध्यक्ष नात्याने करीत आहे.

