पुणे, 18 जुलै : पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाने मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे मत, पूर्वांचल छात्रावास प्रकल्पाच्या प्रांत प्रमुख लीना कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पूर्वांचल छात्रावास पुणे विभागाच्या वतीने ‘रा. स्व. संघ जनकल्याण समिती’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्नेह-मेळाव्यात कुलकर्णी बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या पूनम मेहता, पुणे छात्रावास प्रमुख संपदा खोले यांची उपस्थिती होती.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘राज्यात विविध छात्रावासांमध्ये पूर्वांचलातील 115 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे. यशस्वी झालेले विद्यार्थी पूर्वांचलमध्ये जाऊन चांगल्या प्रकारचे काम करीत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रासार‘या राज्यात येऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नाहीत. आर्थिक मदतीबरोबर विविध प्रकारच्या सेवांसाठी समाजाने मदतीचा हात देणे आवश्यक आहे.’
मेहता म्हणाल्या, ‘पूर्वांचलातील नागरिकांना आपण भारतीय वाटत नाही आणि आपण त्यांना भारतीय मानत नाही. आम्ही भारतीय असताना आम्हाला चिनी किंवा नेपाळी का म्हटले जाते अशी परिस्थिती आहे. ती वेगाने बदलण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पूर्वांचल छात्रावास हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यास मदत होईल.’ शुभांगी कंक यांनी प्रास्ताविक, माया मठकर यांनी सूत्रसंचालन आणि संपदा खोले यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

