पुणे-रक्ताच्या कर्करोगातून बरा झालेल्या हर्षदचा एकोणिसावा वाढदिवस नवीन मराठी शाळेत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
नऊ वर्षांपूर्वी हर्षद नऱ्हे नवीन मराठी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. त्या वेळी त्याला कर्करोगाचे निदान झाले. या वेळी त्याच्या उपचारांसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
हर्षदचे वडील प्रमोद नऱ्हे रिक्षाचालक आहेत. हर्षदच्या गंभीर आजारात शाळेने केलेल्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नऱ्हे यांनी शाळेला एक लाख रुपयांची देणगी दिली. कर्करोगाने आजारी असणाऱ्या मुलांना उपचारादरम्यान सहकार्य मिळावे, यासाठी नऱ्हे यांनी ‘प्रयास फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली आहे.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांनी हर्षदला शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते श्याम मानकर अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका कल्पना वाघ, नूमवि शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कांबळे, एचए शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तनुजा तिकोने, धनंजय तळपे, वैशाली जाधव, प्रिया इंदूलकर, मनिषा आदम, जयश्री एडगांवकर यांनी संयोजन केले.
नवीन मराठी शाळेत आगळा-वेगळा कृतज्ञता समारंभ
Date:

