नोकरीच्या शोधात असलेल्यांना कंपनीच्या नावे चालवल्या जात असलेल्या ऑनलाइन घोटाळ्याविषयी धोक्याची सूचना
थ्रिसुर, 28 फेब्रुवारी 2022 – कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने कंपनीच्या नावे चालवल्या जात असलेल्या ऑनलाइन नोकरी घोटाळ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घोटाळ्याचा एक भाग म्हणून उमेदवारांकडून सुरुवातीला 3500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाते. त्यानंतर दोन आठवड्यांनी परत संपर्क साधून खोटे ऑफर लेटर दिले जाते व नोकरी मिळवण्यासाठी 84,000 रुपये सुरक्षा ठेव रक्कम भरायला सांगितली जाते.
कल्याण ज्वेलर्सने आधी सोशल मीडिया पेजेसवरून कंपनी उमेदवारांकडून अशाप्रकारचे प्रक्रिया शुल्क किंवा अर्ज शुल्क आकारत नसल्याचे स्पष्ट केले आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना या बेकायदेशीर गोष्टीबद्दल किंवा ऑनलाइन घोटाळ्याविरोधात सावध राहायला सांगितले. त्याचप्रमाणे कल्याण ज्वेलर्सने कोणत्याही थर्ड पार्टीस कंपनीच्या वतीने नोकरभरती प्रक्रिया करण्याचे काम दिले नसल्याचेही स्पष्ट केले.
कंपनीने उमेदवारांना कल्याण ज्वेलर्सच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून तिथे ‘करियर’ विभागात संबंधित पदांसाठी अर्ज करावा अशी विनंती केली आहे. इच्छुक उमेदवारांना कल्याण ज्वेलर्सच्या जवळच्या शोरूममध्ये आपला सीव्ही देता येईल आणि कंपनी योग्य पदासाठीअर्जाची छाननी करेल.
थ्रिसुर येथील शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आणि एफआयआर नोंदवण्यात आली आहे. कंपनीने गोळा केलेली माहिती पोलिसांना देण्यात आली असून प्राथमिक तपासकार्य सुरू आहे.


