पुणे : अंदमानातून सुटल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केले? हा प्रश्न विचारला जातो. आंतरजातीय विवाह, विहिरी खुल्या करणे, मंदिर प्रवेश, एकत्रित सहभोजन अशा अनेक चळवळी सावरकरांनी उभ्या केल्या. सावरकर हा एक विचार आहे. त्यांना स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली तरीही केवळ माफीवीर म्हणूनच बोलले जाते, हे दुर्देव आहे. सन १९२४ ते १९३७ हा अंदमान सुटकेनंतरचा काळ म्हणजे सावरकरांचा समाजसुधारक म्हणून जन्म झाल्याचा काळ असल्याचे प्रतिपादन व्याख्याते व सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर जयंती समिती पुणे तर्फे व्याख्याते व सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन याविषयावरील व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे, विवेक जोशी, प्रकाशक पार्थ बावस्कर, समितीचे सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, श्रीकांत जोशी, प्रकाश दाते, अतुल व्यास, उल्हास पाठक, अजय कुलकर्णी, सुजाता मवाळ, विश्वजीत देशपांडे, संयोगिता पागे, पल्लवी गाडगीळ आदी उपस्थित होते. शब्दांमृत प्रकाशन तर्फे शरद पोंक्षे यांच्या दुसरं वादळ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले.
शरद पोंक्षे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना टिळकांची कॉंग्रेस मान्य होती. मात्र गांधीजींची कॉंग्रेस मान्य नव्हती. सन १९३७ साली सावरकर राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये गेले असते, तर त्यांच्यावर आज कोणतेही आरोप झाले नसते. हिंदी राष्ट्रवाद आणि मुस्लिमांचे पराकोटीचे लांगुलचालन या दोन कारणांनी त्यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्यास नकार दिला. हिंदू राष्ट्रवादावरच हे राष्ट्र उभे राहिल, हा सावरकरांचा विचार होता.
ते पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना सावरकरांचा पोस्टाचे तिकीट काढून गौरव केला होता. तसेच त्यांच्या स्मारकासाठीही रुपये १५ हजार रुपये स्वत:च्या खात्यातून दिले होते. हा इतिहास इंदिरा गांधी यांच्या दिल्लीतील नातवाला माहिती नाही. आपण सारे मनुष्य जातीचे आहोत, हा सावरकरांचा विचार होता.
व्यावसायिक दृष्टया जाती आहेत, जन्मानुसार नाही. या व्यवसायांना ब्रिटीशांनी जात लावली व जातीचे राजकारण केले. सावरकरांनी हेच संपवायचा प्रयत्न केला. हिंदू धर्मप्रेम आणि हिंदू राष्ट्रनिर्मीतीचा विचार की सावरकर कॉंग्रेसमध्ये गेले नाहीत, हा त्यांचा गुन्हा होता? वेद, पुराण, कुराण, बायबल हे पूजनीय आहेतच. पण विज्ञान हा धर्मग्रंथ व्हायला हवा. हिंदू राष्ट्र हे माणुसकीचे राष्ट्र आहे. तेथे माणुसकी हाच धर्म आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्रात अहिंदू सर्वात जास्त सुखी राहतील, असेही त्यांनी सांगितले.
विक्रम गोखले म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे केवळ पुतळे उभारुन चालणार नाही, तर त्यांचा विज्ञानविचार आपण स्विकारायला हवा. कोणत्याही जाती-धर्माचे असले, तरी देशावर प्रेम करणारे एकसंध व्हायला हवे. आज देश अडचणींच्या ठिकाणी उभा असून भविष्यात संकटातून जाणार आहे. त्यामुळे स्वत:चे संरक्षण प्रत्येकाला करता आला पाहिजे, तरच आपण संकटांचा मुकाबला करु शकू.
सूर्यकांत पाठक म्हणाले, सावरकरांच्या सखोल विचारांनी समाजाला ताकद मिळेल. सावरकर हे तेजस्वी, तत्वज्ञानी व एक विचार आहेत. त्यामुळे समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे शहरात आज ४४२ ठिकाणी सावरकर जयंती साजरी करण्यात आली. पुढील वर्षी सावरकरांचे विविध पैलू मांडणा-यांना सावरकरांच्या नावाने समितीतर्फे पुरस्कार दिला जाईल, असा संकल्पही त्यांनी यावेळी सांगितला. प्रविण तरडे, पार्थ बावस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. राधिका देशपाडे यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद माणकीकर यांनी आभार मानले.

