मुंबई- छगन भुजबळ ,नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे असताना सेनेला हादरा देण्याचा प्रयत्न केला होता ,आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि सेना प्रमुख असताना सेनेला हिसका दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाईघाईने आमदारांची तातडीची बैठक बोलावली, तर मित्रपक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सर्व आमदारांना बोलावले आहे. दुसरीकडे तिसरा सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. एकनाथ शिंदे सुरतमध्ये गेल्यापासून राज्यातील राजकीय घटनांनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
अजय चौधरी शिवसेनेचे नवे गटनेते
शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर वर्णी लागली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात. असा दावा अनेक राजकीय अभ्यासक करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या बैठकीला केवळ 18 आमदार उपस्थित असल्याने इतर आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील आहेत. ठाणे शहरात गेल्यानंतर त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे ११वीपर्यंत शिक्षण घेतले. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक, त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो. एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून खासदार आहेत. ऑक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. २०१४ मध्येच महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये PWD चे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती तर २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण (महाराष्ट्र सरकार) कॅबिनेट मंत्री पद मिळाले.२०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे वाटले होते. पण शरद पवार आणि सोनिया गांधी यांना उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटत होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव होता. त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता होता राहिले.